esakal | हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज 
sakal

बोलून बातमी शोधा

rain

पावसाळ्यापूर्वी बाबाराव जाधव यांनी व्यक्त केलेल्या पाऊसमानाची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. पावसाळ्यातील पावसाचा खंड व पाऊस कालावधी याबद्दल त्यांनी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला.

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज 

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : 'बरसेल हस्त तर शेतकरी मस्त', अशी जुन्या काळातील पावसासंदर्भात अनुभवातून आलेली एक म्हण आहे. अर्थातच हस्त नक्षत्राचा पाऊस पिकांसाठी जीवनदायी व शेवटच्या टप्प्यात भरघोस पीक देणारा असतो. यावेळी रविवारी (ता.२७) सकाळी १२ वाजून २६ मिनिटांनी हस्त नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन मोर असून, या कालावधीत भरपूर पाऊस बरसेल. शिवाय पुढील चित्रा व स्वाती नक्षत्रातही धो-धो पाऊस पडण्याचा अंदाज दहागाव येथील शेतीनिष्ठ शेतकरी व हवामानाचे जुने जाणकार बाबाराव जाधव यांनी ‘सकाळ’जवळ व्यक्त केला. 

पावसाळ्यापूर्वी बाबाराव जाधव यांनी व्यक्त केलेल्या पाऊसमानाची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. पावसाळ्यातील पावसाचा खंड व पाऊस कालावधी याबद्दल त्यांनी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. पीक जोमदार येणार, पण सप्टेंबरमधील पाऊस पिकांची नासाडी करणार, ते त्यांनी आपल्या अंदाजात सांगितले होते. रविवारी (ता.२७) ‘सकाळ’ला त्यांनी हस्त नक्षत्रात पाऊस चांगला बरसण्याचे संकेत दिले. हस्त नक्षत्राचे वाहन मोर असून, सध्या पाऊस बरसत असल्याचे ते म्हणाले. 

लघुपटाच्या नायिकेनेच लावला निर्मात्याला लाखोंचा चुना
 

शिवाय १० ऑक्‍टोबरला चित्रा नक्षत्र प्रारंभ होत आहे. या नक्षत्राचे वाहन बेडूक असून, या नक्षत्रातही पाऊस बरसणार आहे. येत्या २३ ऑक्‍टोबरला स्वाती नक्षत्र सुरू होईल. या नक्षत्राचे वाहन म्हैस असून, म्हशीला पाणी प्रिय असल्याने भरपूर पावसाची शक्‍यता जाधव यांनी व्यक्त केली. 

बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाला शेततळ्यात बुडवले
 

रब्बी पिकाचा हंगाम सर्वसाधारण 

यंदाच्या हंगामात सोयाबीन पीक जोरदार आले. परंतु, सप्टेंबरमधील धुव्वाधार झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीला लगडलेले बोंड काळवंडून सडत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे डोह साचले आहेत. त्यामुळे पीक भरघोस येऊनही उत्पादनखर्च निघण्याची शेतकऱ्यांची आशा मावळली आहे. पीकपाणी जोरदार होणार; परंतु, वादळवाऱ्यासह येणाऱ्या पुढील तीनही नक्षत्रांतील पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली. शिवाय जानेवारी व फेब्रुवारीच्या शेवटी अवकाळी पाऊस, वारा-वादळ व गारपीट अशी संकटांची मालिका शेतकऱ्यांपुढे राहणार असल्याची शक्‍यता जाधव यांनी बोलून दाखविली. रब्बी पिकाचा हंगाम सर्वसाधारण राहील, असेही ते म्हणाले. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

loading image
go to top