esakal | कोण म्हणाले, धीर धरा, भारतीय संघाचे दरवाजे लवकरच उघडतील
sakal

बोलून बातमी शोधा

किरण मोरे

ही एक प्रक्रिया आहे. उमेश यादवला अशीच एक संधी मिळाली आणि तो गेल्या अकरा वर्षांपासून भारतासाठी खेळतो आहे. गेल्या तीन वर्षांतील यशामुळे भक्कम पाया तयार झाला आहे. एक वेळ अशी येईल की विदर्भाचे पाच-पाच खेळाडू भारतीय संघात राहतील.

कोण म्हणाले, धीर धरा, भारतीय संघाचे दरवाजे लवकरच उघडतील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या तीन वर्षांत विदर्भाच्या रणजी आणि ज्युनिअर संघाने मिळून नऊ स्पर्धांचे विजेतेपद मिळविले असले तरी त्या तुलनेत विदर्भाच्या क्रिकेटपटूंना भारतीय अ किंवा भारतीय सिनिअर संघात संधी मिळाली नाही, अशी खंत व्यक्त केल्या जात आहे. मात्र, धीर धरा भारतीय संघाचे दरवाजे तुमच्यासाठी लवकरच उघडतील. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे, असा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी विदर्भातील क्रिकेटपटूंना दिला.


ते मुंबई इंडियन्स गुणवत्ता शोधमोहिमेअंतर्गत नागपुरात आयोजित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी आले होते. चॅम्पियन्स झाले म्हणून जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळते, असे नाही. ही एक प्रक्रिया आहे. उमेश यादवला अशीच एक संधी मिळाली आणि तो गेल्या अकरा वर्षांपासून भारतासाठी खेळतो आहे. गेल्या तीन वर्षांतील यशामुळे भक्कम पाया तयार झाला आहे. एक वेळ अशी येईल की विदर्भाचे पाच-पाच खेळाडू भारतीय संघात राहतील, असे माजी यष्टिरक्षक असलेले मोरे म्हणाले. ते म्हणाले, गुणवत्ता असलेल्या खेळाडूंचा शोध घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने सुरू केलेली आंतरशालेय स्पर्धा हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. युवा क्रिकेटपटूंसाठी हे उत्तम व्यासपीठ असून या संधीचा केवळ मुंबईलाच नव्हे तर विदर्भ क्रिकेटलाही फायदा होणार आहे. विदर्भाने दोनदा रणजी विजेतेपद मिळविले म्हणून आम्ही येथे मुद्दाम आलो नाही. ग्रास रुट पातळीवर गुणवत्ता शोधावी लागते आणि ती शोधण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.

अवश्य  वाचा - येथे साकारला जातोय भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक

चंद्रकांत पंडितचा पुतळा उभारा
विदर्भाने तीन वर्षांत देशांतर्गत स्पर्धेत नऊ विजेतेपद मिळविले, याचे प्रमुख श्रेय चंद्रकांत पंडितला द्यायला पाहिजे. त्यामुळे व्हीसीएने त्यांचा पुतळा उभारायला पाहिजे, असे मोरे गमतीने म्हणाले. विदर्भ क्रिकेट संघटनेकडे असलेल्या सुविधा सर्वोत्तम आहे. त्याचा फायदा क्रिकेटपटूंनी घ्यायला पाहिजे. विदर्भ क्रिकेट संघटना सध्या भारतातील एक सर्वोत्तम संघटना आहे, हे मान्य करायला पाहिजे, असेही ते म्हणाले.

भारताचा वेगवान मारा सर्वोत्तम
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. टी-20 मालिकेत भारताने निर्भेळ यश मिळविल्यानंतर एकदिवसीय मालिकेतून सपाटून मार खावा लागला. आता कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. यावर बोलताना मोरे म्हणाले, यंदा टी-20 वर्ल्ड कप असल्याने सर्वांचा फोकस टी-20 सामन्यांवर होता. त्यामुळे आपण चांगली कामगिरी केली. एकदिवसीय मालिकेत आपण काही प्रयोग केले. यानंतर कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धा सुरू होत आहे. भारतासाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. भारतीय कसोटी संघाचा विचार केल्यास सध्या भारताचा वेगवान मारा सर्वोत्तम आहे. असा वेगवान मारा यापूर्वी कधीही नव्हता. त्याचप्रमाणे अश्‍विन, जडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकीपटू आहेत. गोलंदाजांच्या सोबतीला मजबूत अशी फलंदाजी आहे. त्यामुळे भारताला कसोटीत पराभूत करणे सोपे नाही.