येथे साकारला जातोय भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

स्कायवॉकची लांबी ही सुमारे 200 फुटापर्यंत असणार आहे. ज्यामुळे आगामी काळात हा स्कायवॉक पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू शकते.

अकोला : विदेशातील अनेक ठिकाणी असलेले काचेचे स्कायवॉक नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. मात्र, प्रत्येक नागरिकांना विदेशवारीला जाणे शक्य नसते. त्यामुळे अकोलेकरांना शहरातच स्कावॉकचा आनंद घेता यावा, यासाठी स्थानिक नेहरू पार्कमध्ये संचालक बी. एस. देशमुख यांच्या संकल्पनेतून भारतातील पहिला काचेचा हलणारा स्कायवॉक साकारल्या जाणार आहे. या स्कायवॉकची लांबी ही सुमारे 200 फुटापर्यंत असणार आहे. ज्यामुळे आगामी काळात हा स्कायवॉक पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू शकते.

महत्त्वाची बातमी - पानटपरीवाल्याने चक्क अन्न व औषध प्रशासन मंत्र्यालाचा दिला ‘गुटखा’

जगभरातील पर्यटनाच्या ठिकाणी अनेक देशांनी स्कायवॉकचे प्रकल्प सुरू केले आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. त्यामुळे अकोलेकर पर्यटकांकडूना शहरातच विदेशी स्कायवॉकचा आनंद घेता यावा यासाठी स्थानिक नेहरू पार्कमध्ये भारतातील पहिला हलणारा काचेचा स्कायवॉक निर्माण करण्यात येत आहे. जानेवारी 2020 मध्ये त्याचे काम सुरू करण्यात आले असून 15 मार्च 2020 पर्यंत तो नागरिकांसाठी खुला करण्याचा मानस संचालक देशमुख यांनी व्यक्त केला आहे. दिल्ली येथून स्कायवॉकसाठी लागणारे अनब्रेकेबल काचही मागविण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे बजेट हे सुमारे 1 कोटी रुपयांपर्यंत असू शकते. मात्र त्यामध्ये बदलही होऊ शकते असेही देशमूख यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

क्लिक करा - क्षुल्लक कारणावरून राडा; पोलिसांसोबत बाचाबाची

असा असेल स्कायवॉक
अनब्रेकेबल काचांनी निर्माण करण्यात येणारा हा स्कायवॉक 150 ते 200 फुट लांब, 3 ते 4 फुट रुंद तर 25 ते 30 फुट त्यांची उंची असेल. काचांनी निर्मात हा स्कायवॉक पूर्णपणे हलणारा असेल. भारतात असा स्कायवॉक हा सिक्किममध्ये आहे. मात्र तो स्थिर असल्याने हलणार स्कायवॉक म्हणून हा देशातील पहिला स्कायवॉक असल्याचा दावा नेहरूपार्क कडून करण्यात आला आहे. एकावेळी 60 ते 70 व्यक्ती त्यावरून प्रवास करू शकतील असेही सांगण्यात आले आहे.

15 मार्चपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण
स्कायवॉकचे पोल उभे झाले आहेत. 15 मार्चपर्यंत संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर तो पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. हलणार स्कायवॉक असल्याने तो भारतातील पहिला स्कायवॉक ठरणार आहे. पर्यटकांना निश्‍चितच हा प्रकल्प आकर्षित करेल.
-बी.एस.देशमुख, संचालक, नेहरू पार्क, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: glass skywalk in akola