
अमरावती : एका वेबसाईटच्या माध्यमातून ज्याला जीवनसाथी बनविले तोच धोकेबाज निघाला. त्याने एकाच युवतीला दगा दिला असे नाही तर अनेकींच्या जीवनात अंधार पसरविला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर मोबाईल विक्रेत्यालाही त्याने फसविल्याची बाब पुढे आली आहे.
वेबसाइटच्या माध्यमातून एका महिलेची शेख सुभान शेख शरीफ ऊर्फ शहनशाह शेख शरीफ (रा. संतोषनगर, हैदराबाद, तेलंगण) याच्याशी ओळख झाली. त्याने या महिलेकडे विवाहाचा प्रस्ताव मांडला. योग्य वराच्या शोधात असलेल्या महिलेने त्याला त्याच्या आईवडिलांसोबत घरी येण्यास व कुटुंबीयांसोबत चर्चा करण्यास सांगितले.
१८ नोव्हेंबर २०१९ ला मात्र तो एकटाच महिलेच्या घरी आला. लग्नासंदर्भातील चर्चा झाली, तिने त्याचे आधारकार्ड तपासले. त्यावर शेख सुभान शेख शरीफ, असे नाव होते. तो हैदराबाद येथील बंजारा हिल येथे राहत असून बीटेक झाल्याचे व अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून नोकरी केल्याची पूरक माहिती त्याने दिली. त्याने दिलेली सर्व माहिती तपासल्यानंतर या महिलेने विवाहासाठी होकार दिला. पुढे ७ जून २०२० ला त्यांचा विवाह झाला. दरम्यान कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे त्यांना हैदराबाद येथे जाता आले नाही व त्याने पीडितेच्या घरातच मुक्काम ठोकला.
२३ जूनला शेख सुभानने रुक्मिणीनगर येथील कलंत्री मोबाईल शॉपीमधून ८१ हजार ५०० रुपयांचा ऍपल कंपनीचा मोबाईल ऑनलाइन खरेदी केला. मात्र मोबाईल विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्याने तो मोबाईल लगेच दुसऱ्याला पन्नास हजार रुपयांत विकला. इकडे पैसे मिळाले नाही म्हणून मोबाईल विक्रेता त्याचा शोध घेत असतानाच दुसऱ्या खरेदीदाराने तो सुरू करताच त्याचे लोकेशन विक्रेत्याला मिळाले. दुसऱ्या खरेदीदारांकडून शेख सुभानचा शोध कलंत्री मोबाईल शॉपीधारकास मिळाला. त्यामुळे आपली फसवणूक केल्याचे कलंत्री यांच्या लक्षात आले.
शेख सुभानची वर्तणूक संशयास्पद वाटल्याने पीडितेच्या भावाने शेख सुभानबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेख सुभानने तलाक झालेल्या अनेक महिलांना अशाच पद्धतीने फसविल्याचे उघडकीस आले. तर पीडितेनेही शेख सुभानचा मोबाईल तपासला असता तिलाही त्याने बऱ्याच महिलांना फसविल्याचे आढळून आले. त्याचे खरे नाव शेख सुभान नसून शेख शहंनशाह शेख शरीफ असल्याचे कळले. त्याने विवाहापूर्वी दिलेली माहिती खोटी असल्याचे दिसून आले. याबाबत विचारणा केली असता त्याने पीडितेला व तिच्या मुलीस जीवे मारण्याची धमकी देणे सुरू केले. अखेर तिने गाडगेनगर पोलिसांना आपबिती सांगून मदत मागितली. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी शेख सुभान ऊर्फ शेख शहंनशाह शेख शरीफ याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.
सविस्तर वाचा - नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी मुंबईत बदली
शहंशाहचा गोरखधंदा
विवाहविषयक संकेतस्थळावर घटस्फोटित महिलांचे प्रोफाइल पाहून त्यांच्याशी तो संपर्क साधायचा. त्यांच्याशी लग्न करून लैंगिक शोषण आणि फसवणूक करायचा, असा शहंशाहचा गोरखधंदा होता. त्याने देशभरातील आठ महिलांची फसवणूक केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
मनीष ठाकरे, ठाणेदार, गाडगेनगर
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.