"ते' शेतात चारा कापत होते अन्‌ अचानक घडले असे... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

शेतात चारा कापीत असताना दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सीताराम घाबरून गेले. काय करावे त्यांना काहीच कळत नव्हते. ते अस्वलांपासून सुटका करण्यासाठी इतरांची मदत मागावी म्हणून ते जोरजोराने ओरडायला लागले.

मुंडीकोटा (जि. गोंदिया)  : शेळ्यांकरिता चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर दोन अस्वलांनी हल्ला केला. यात त्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 11) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सीताराम सखाराम बिसेन (वय 50) असे मृताचे नाव आहे. 

दोन अस्वलांनी केला हल्ला

मुंडीकोटा तालुक्‍यात असलेल्या वडेगाव येथील सीताराम बिसेन हे शेतकरी शेळ्यांकरिता चारा आणण्यासाठी शनिवारी (ता.11) सकाळी स्वतःच्या मालकीच्या शेतात गेले होते. शेतात चारा कापीत असताना दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे सीताराम घाबरून गेले. काय करावे त्यांना काहीच कळत नव्हते. ते अस्वलांपासून सुटका करण्यासाठी इतरांची मदत मागावी म्हणून ते जोरजोराने ओरडायला लागले. परंतु इतक्‍या सकाळी शेतशिवारात कोणी नसल्यामुळे त्यांच्या मदतीला कोणीही धावून येऊ शकले नाही. त्यांनी अस्वलांना हाकलून लावण्यासाठी खूप प्रयत्न केले. आपल्या हातातील विळ्याने त्यांच्यावर प्रहार सुद्धा केले. परंतु दोन अस्वलांचा सामना करण्यात ते अयशस्वी ठरले. अस्वलांनी त्यांना ओरबाडून रक्तबंबाळ केले. अस्वलांनी सीतारामला नाल्याच्या काठावर फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा- ...अन्‌ अचानक आला "तो' समोर! पसरली सर्वत्र दहशत

गुराख्यांना दिसला मृतदेह

नाल्याच्या काठावर पडलेल्या सीतारामचा मृतदेह दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तेथे गुरे चारण्यासाठी आलेल्या गुराख्यांना दिसला. त्यांनी घटनेची माहिती क्षणात गावात पसरली. त्यामुळे गावकरी घटनास्थळी धावून आले. सीताराम यांच्या पश्‍चात पत्नी व तीन मुली आहेत. घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "He were cutting fodder in the fields and it happened suddenly ...

टॅग्स
टॉपिकस