नागपूरला एचसीएलचे मुख्यालय करा

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः शहराचा सर्वांगीण विकास होत असताना एचसीएल टेक्‍नॉलॉजी लिमिटेडने नागपूरला कंपनीचे मुख्यालय करण्याचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. नागपूर हे देशाच्या हृदयस्थानी असल्याचे सांगून येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना फक्त कौशल्य प्रशिक्षणाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मिहान प्रकल्पातील एमएडीसी आणि एचसीएलच्या विस्तारित कॅम्पस संदर्भातील सामंजस्य कराराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, एचसीएलचे मुख्य मानव संसाधन अधिकारी अपूर्वा व्ही. व्ही., कार्यकारी उपाध्यक्ष संजय गुप्ता, एमएडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार समीर मेघे उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, मिहान प्रकल्पाचा पाया 1998 मध्ये युती सरकारच्या काळात मी बांधकाममंत्री असताना रोवण्यात आला. आता जागतिक दर्जानुसार मिहानचा विकास झालेला आहे. एचसीएलने तीन वर्षांपूर्वी गुंतवणूक काढण्याचा विचार केला होता. मात्र, कंपनीचे अध्यक्ष शिव नाडार यांना विश्‍वास दिल्यानंतर त्यांनी एका वर्षापूर्वी मिहानमध्ये कंपनी सुरू केली. त्यात आतापर्यंत एक हजार युवकांना नोकरी दिली आहे. पुढील पाच वर्षांत आठ हजार लोकांना नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले आहे.
यामुळेच मिहान प्रकल्पातून पन्नास हजार रोजगार देण्याच्या स्वप्नाला आता बळ मिळू लागले असल्याचे सांगत नितीन गडकरी म्हणाले, लवकरच भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. एसईझेडमधील अनिल धीरुभाई एरोस्पेस पार्कमध्ये भारतीय बनावटीचे स्वयंनिर्मित 11 सिटर चार्टर्ड जेट "फाल्कन' हे विमान तयार होणार आहे. हवाईसेवा, रस्ते आणि रेल्वे मार्गाने नागपूर जोडल्या गेल्याने जीएसटी आल्यानंतर या शहराचे महत्त्व वाढले आहे. यामुळेच भविष्यात लॉजिस्टीक हबसाठी हे शहर ओळखले जाईल. एचसीएल कौशल्य विकास केंद्र सुरू करीत असल्याने विदर्भातील अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी नागपुरातच उपलब्ध झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले. तत्पूर्वी एचसीएलचे उपाध्यक्ष संजय गुप्ता आणि एमएडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आप्पाराव व्ही. व्ही. यांची भाषणे झाली. आभार उपाध्यक्ष संजय गुप्ता यांनी मानले.
काकाणीला कानपिचक्‍या
मिहानमध्ये अनेक मोठ्या कंपन्या येण्यास इच्छुक आहे. त्यासाठी एमएडीसीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी स्पीड वाढवावी. तुमची स्पीड आणि माझ्या स्पीडमध्ये बरेच अंतर असल्याचे सांगून काकाणी यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कानपिचक्‍या दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com