असे का घडले की, कोठीच्या आरोग्य उपकेंद्राला कुलूप लागले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाने जगात सर्वत्र हाहाकार माजला आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याच्या सूचना आहेत. परंतु भामरागड तालुक्‍यातील कोठी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्याविना ओस पडले आहे.

भामरागड (जि. गडचिरोली) : देशभरात कोरोनाचा उद्रेक सर्वत्र सुरू असताना यावर शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, अशाही परिस्थितीतही नक्षलग्रस्त भामरागड तालुक्‍यातील कोठी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुलूपबंद अवस्थेत आहे.

सध्या स्थितीत या ठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने या परिसरातील नागरिकांत आरोग्य विभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.

आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्याविना ओस

कोरोना विषाणू प्रादुर्भाने जगात सर्वत्र हाहाकार माजला आहे. आजवर अनेकांचे बळी गेले आहेत. दररोज या रोगाचे रुग्ण वाढतच असल्याने शासनाने सर्व स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणा व पोलिस विभाग दिवसरात्र झटत आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याच्या सूचना आहेत. परंतु भामरागड तालुक्‍यातील कोठी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचाऱ्याविना ओस पडले आहे.

रुग्णांनी तपासणीसाठी जायचे कुठे

त्यामुळे कोरोनाबाबत संबंधित रुग्णांनी तपासणीसाठी जायचे कुठे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट ब, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, परिचारिका, परिचारिका कंत्राटी, परिचर अशा सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, सध्या स्थितीत एकही कर्मचारी येथे हजर नाही. अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून उपस्थित नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

आरोग्यसेवेची समस्या

कोठी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत तुमकोर्टी, मुरुम्भूमी, तोयनार, मरकनर, पिडमिली, पदहूर, कोठी आदी दुर्गम गावे येत असून 30 किलोमीटर अंतरापर्यंत आरोग्य सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेची समस्या भेडसावत आहे.

हेही वाचा : साहेब तिखट-मीठ देता का? हातावर पोट असणाऱ्यांचे हाल

अधिकाऱ्यांचा वचक नाही

गेल्या काही दिवसांपासून हे आरोग्य केंद्र बंद आहे. 30 किलोमीटर परिसरातील ग्रामस्थ येथे उपचारासाठी येतात. सध्या सर्वत्र कोरोनाची भीती आहे. अशावेळी हे आरोग्य केंद्र बंद असणे, अनेकांच्या जीवावर बेतू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता कर्मचारी जर आरोग्य केंद्र बंद ठेवून सुटी घेत असतील; तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जिल्हा प्रशासनानेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the health center of the gadchiroli kothiche was locked