वरुणाचा झंझावात सुरू झाला अन्‌ तुटला 60 गावांचा संपर्क 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

सोमवारी एटापल्ली येथे विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा व दमदार पावसामुळे जंगलातील अनेक झाडे कोलमडून पडली.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : मागील काही दिवसांपासून आभाळात ढगांची चुळबूळ सुरू असताना अखेर सोमवारी (ता. 15) जिल्ह्यात अनेक ठिकाणी मृगधारा बरसल्या. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्‍यात दमदार पाऊस सुरू असून पन्नास ते साठ गावांचा संपर्क तुटला आहे. 

मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून एटापल्ली तालुक्‍यात पाऊस दररोज दमदार हजेरी लावत असून नदीनाल्यांना पूर आल्याने दुर्गम भागांतील अनेक नागरिकांचा तालुक्‍याशी संपर्क तुटला आहे. सोमवारी एटापल्ली येथे विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा व दमदार पावसामुळे जंगलातील अनेक झाडे कोलमडून पडली. बांडे नदी, गट्टा, कोठी, झुरी, देवदा, रोपी, गिलांगुडा इत्यादी नाल्यांना आलेल्या पुरामुळे कचलेर, कुदरी, रेगादंडी, भूमकाम, गर्देवाडा, जवेली, कोरनार, पिपली, बुर्गी, जिजावंडी, कोइनवशी, हिंदुर, हिक्‍केर, मेडरी व पुसूमपल्ली अशी पन्नास ते साठ गावे तालुक्‍याच्या संपर्काबाहेर गेली आहेत.

अवश्य वाचा-  साडेतीन लाख द्या अन्यथा व्हिडीओ करतो व्हायरल... त्यांनी दिली विवाहितेला धमकी 

त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी, शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे, बी-बियाणे व खतांची खरेदी, आजारी रुग्णांसाठी आरोग्य उपचार इत्यादी समस्या निर्माण झाल्या आहेत. नदी घाटावरून नागरिकांना तालुका स्तरावर ये-जा करण्यासाठी नावेची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rainfall in Gadchiroli district. 60 villages affected