लाडज गावाला महापुराने वेढले; हेलिकॉप्टर आले गावकऱ्यांच्या मदतीला... 

राहुल मैंद
Sunday, 30 August 2020

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील लाडज हे गाव सध्या महापुराने वेढले आहे. या गावात एकही सुरक्षित ठिकाण राहिलेले नाही. परिणामी पाचशेची लोकसंख्या असलेले हे गाव आता जलमय झाले आहे.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) ः गोसीखुर्द धरणाच्या महत्तम विसर्गाने वैनगंगा नदीत सुमारे ३१ हजार क्‍युमेक्‍स पाणी सोडले जात आहे. याचा फटका चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना मुख्यत्वे बसला आहे. नदीच्या दोन प्रवाहाने बेट झालेले लाडज हे गाव सध्या महापुराने वेढले आहे. या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी प्रशासनाने एका बाजूने बोटीची व्यवस्था केली आहे, तर दुसरीकडे वायुदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेत या नागरिकांना ‘एयरलिफ्ट’ करण्याची तयारी सुरू केली आहे. 

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील लाडज हे गाव सध्या महापुराने वेढले आहे. या गावात एकही सुरक्षित ठिकाण राहिलेले नाही. परिणामी पाचशेची लोकसंख्या असलेले हे गाव आता जलमय झाले आहे. यासाठी वायुदलाचे हेलिकॉप्टर सध्या लाडज गावातील आकाशात घिरट्या घालत आहेत. लाडज येथे सुरक्षित ठिकाणाहून नागरिकांना हेलिकॉप्टरमध्ये घेतले जाणार आहे. यासाठी जागेची निवड केली जात आहे.

अवश्य वाचा- काय सांगता या गावात पडला चक्क मासोळ्यांचा पाऊस...
 

दुसरीकडे नदीचे पाणी वेगाने वाढत असून अंधार पडण्याच्या आत नागरिकांना एयरलिफ्ट करणे गरजेचे आहे. मात्र, सध्यातरी केवळ एका बोटीद्वारे बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरने अद्याप एअरलिफ्ट सुरू झालेले नाही. आगामी काळात लाडज व आसपासच्या दहा गावांची स्थिती बिकट होणार आहे. या ठिकाणी पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद होत आहेत.

अवश्य वाचा- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे का थांबले अर्थचक्र ... वाचा, हे आहे कारण 
 

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील कोलारी, भालेश्‍वर, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव (भो), चिखलगाव, लाडज, रणमोचन, पिंपळगाव (खरकाडा), बरडकिन्ही, चिचगाव, बेटाळा या गावांत पुराचे पाणी शिरले आहे. हजारो हेक्‍टर शेतीही पुराच्या पाण्याखाली आली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या बेलगाव येथील नागरिकांना देऊळगाव, तर लाडज येथील नागरिकांना चिखलगाव येथे रेस्क्‍यू टिमच्या माध्यमातून बोटच्या मदतीने पुरातून बाहेर काढण्यात येत आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helicopter came to rescue the people in Ladaj Village