नरबळी घटनेतील सर्व आरोपी निर्दोष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणातील सर्व सात आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष सुटका केली आहे. यातील सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने फाशी सुनावली होती, तर एका महिला आरोपीवर पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात दोषी ठरविले होते. ही घटना घाटंजी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरंबा गावात 2012 मध्ये दसऱ्याच्या दिवशी 24 ऑक्‍टोबरला घडली होती.

पोलिसांनी याप्रकरणी मनोज लाल्या आत्राम (19), देवीदास आत्राम (22), यादवराव टेकाम (50), पुनाजी आत्राम (57), मोतीराम मेश्राम (54), रामचंद्र आत्राम (70), यशोदा मेश्राम (60) व दुर्गा शिरभाते या आठजणांविरुद्ध आरोप निश्‍चित केले व यवतमाळ जिल्हा न्यायालयात या सर्वांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हे सर्व आरोपी सपनाचे जवळचे नातेवाईक आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार यशोदा मेश्राम ही सपनाची आजी होती.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी 14 ऑगस्ट 2017 रोजी या प्रकरणाचा निकाल घोषित केला. आरोपी मनोज आत्राम, देवीदास आत्राम, यादवराव टेकाम, पुनाजी आत्राम, मोतीराम मेश्राम, रामचंद्र आत्राम व यशोदा मेश्राम या सात आरोपींना फाशीची शिक्षा; तर, पुरावे नष्ट करण्याचा आरोप असलेल्या दुर्गा शिरभातेला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, शिक्षा घोषित होण्यापूर्वी पॅरोलवर बाहेर आलेल्या रामचंद्र आत्रामचा मृत्यू झाला होता.
फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकारने; तर फाशी घोषित झालेल्या सहाही आरोपींनी या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले. या प्रकरणावर नागपूर खंडपीठात ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी सुरू झाली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी दोषी ठरवलेल्या दुर्गा शिरभातेने मात्र शिक्षेला आव्हान दिले नव्हते. उच्च न्यायालयात सरकारी पक्ष सबळ पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे न्यायालयाने सर्व सातही आरोपींना निर्दोष ठरवले. आरोपींतर्फे ऍड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high court verdict