esakal | हिंगण्यातील भाड्याची घरे ओस
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

हिंगण्यातील भाड्याची घरे ओस

sakal_logo
By
राजेश रामपूरकर ः सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः आर्थिक मंदीच्या सावटाखाली अनेक देशांची अर्थव्यवस्था अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या महामंदीचा फटका हिंगणा येथील इस्टेट एजंटना चांगलाच बसला आहे. या औद्योगिक परिसरातील 70 टक्के उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण होत नसल्याने एजंटला आठवडाभरात एखादे घर भाड्याने देणेही अशक्‍य होत आहे. सरकारकडून अर्थव्यवस्था ताळयावर आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, ते अयशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.

2010 पर्यंत या परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाची वर्दळ होती. त्यामुळे घरांची विक्री व भाड्याने घरे घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. परिणामी, बिल्डरांचा व्यवसाय त्या वेळी तेजीत होता. येथील भाड्याने घरे मिळवून देणाऱ्या एजन्टचीही चांदी होती. दरम्यान, या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरे बांधली. आता उद्योग बंद पडले आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे हिंगण्यात भाडे तत्त्वावर देण्यासाठी बांधलेल्या घरांपैकी 40 टक्के घरे रिकामी आहेत. सहा ते आठ महिने भाडेकरू मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे घर मालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. हिंगणा व डिगडोह परिसरात हजारो घरमालकांनी भाडेतत्त्वावर देण्यासाठी घरे बांधली. आर्थिक मंदीमुळे हिंगणा एमआयडीसीतील कंपन्या बंद पडल्या. परिणामी, साडेतीन ते चार हजार घरे अद्यापही रिकामी आहेत. यामुळे कुणी भाड्याने घर घेता का घर असे म्हणण्याची वेळ मालकांवर आली आहे.

दहा ते बारा वर्षांपासून या परिसरात उद्योग धंदे जोमात होते. तसेच इंजिनिअरिंग आणि विविध अभ्यासक्रम शिकण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत होते. भाड्याच्या घरासाठी अनेकांकडून विचारणा होत होती. यातील संधी लक्षात घेता बॅंकेतून कर्ज काढले. भाड्याने घर देण्यासाठी घरांचे बांधकाम केले. दोन वर्षांपूर्वीपर्यंत स्थिती चांगली होती. हळूहळू भाडेकरू मिळणेही अशक्‍य होऊ लागले होते. आता तर सहा ते आठ महिने भाडेकरी मिळत नाहीत. त्यामुळे व्याजाचा परतावा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दैनंदिन जीवन कसे जगावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आमचा परिवार आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
- सुनीता राऊत, घर मालकीण
हिंगणा एमआयडीसीतील उद्योगाची स्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे या परिसरातील भाड्याने देण्यासाठी बांधलेली घरे रिकामी आहेत. पूर्वी आठवड्यातून एकदा दोन ते तीन जण घरांची चौकशी करण्यासाठी येत होते. आता एक ते दीड महिन्यानंतर येतात. यामुळे घरमालक आर्थिक संकटात अडकले आहेत.
- बबन पडोळे, व्यावसायिक

loading image
go to top