
बुधवारी लिखाणाच्या संपूर्ण नोंदी स्क्रीनवर दाखविण्यात आल्या. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि त्यांचे सहकारी सरकारी वकील ॲड. प्रसाद सोईतकर यांनी भाग घेतला. पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या १५, १६ व १७ तारखांना होणार आहे.
हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात बुधवारी अंकिताच्या आई-वडिलांची साक्ष पूर्ण झाली. आईची साक्ष सुमारे दीड तास चालली. साक्ष देताना अंकिताच्या आईला भावना अनावर होऊन रडू कोसळल्याने न्यायालयाचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले होते.
बुधवारी सुनावणीचा तिसरा दिवस होता. सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी शवपरीक्षण पंचनाम्याचे पंच साक्षीदार श्रीमती देशमुख, प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर आणि घटनास्थळावरील पंच सचिन बुटले या तिघांच्या साक्षी नोंदविल्या होत्या. मंगळवारी दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अभय तळवेकरची साक्ष झाली. काल अंकिताचे वडील अरुण पिसुड्डे यांची साक्ष पूर्ण झालेली नव्हती. ती आज पूर्ण झाली.
विदर्भातल्या ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा
महत्वाची म्हणजे बुधवारी अंकिताची आई संगिता हिची साक्ष झाली. साक्षीदरम्यान त्यांच्या भावना अनावर होऊन त्यांना रडू कोसळले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने न्यायालयाचे कामकाज १५ मिनिटे तहकूब करण्यात आले. अंकिताच्या आईने साक्षीत आरोपी विकेश नगराळे हा नेहमीच अंकिताला त्रास देत असल्याचे व यापूर्वीही त्याने तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचे न्यायालयात सांगितल्याची माहिती ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली.
सुमारे दीड तास आई संगीताची साक्ष चालली. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे आरोपीची ओळखपरेड घेणारे कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार विजय पवार यांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयाची वेळ संपल्याने त्यांचा उलटतपास पूर्ण होऊ शकला नाही. कामकाजाच्या प्रारंभी आरोपीचे वकील भूपेंद्र सोने यांनी कामकाज लिहून डिजिटल स्क्रीनवर न्यायालयात दाखविण्यात यावे, अशी विनंती केली.
न्यायालयाने ही विनंती मान्य केली. बुधवारी लिखाणाच्या संपूर्ण नोंदी स्क्रीनवर दाखविण्यात आल्या. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि त्यांचे सहकारी सरकारी वकील ॲड. प्रसाद सोईतकर यांनी भाग घेतला. पुढील सुनावणी फेब्रुवारीच्या १५, १६ व १७ तारखांना होणार आहे.
अधिक माहितीसाठी - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली
न्यायालयातील कामकाजाच्या मध्यांतरादरम्यान न्यायालय परिसरातच आरोपी विकेश नगराळे आणि त्याच्या पत्नीची भेट झाली. आरोपीच्या पत्नीसोबत त्याची चिमुकली मुलगीही होती. या भेटीदरम्यान भावुक वातावरण निर्माण झाले होते.
संपादन - नीलेश डाखोरे