मोठी बातमी : अंकिताला जाळणा-या आरोपीने कारागृहात केला आत्महत्येचा प्रयत्न?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

अंकितावर पेट्रोल फेकल्यानंतर दुचाकीने पसार झालेल्या विक्‍की नगराळेला हिंगणघाट पोलिसांनी चार तासांत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे अटक केली. त्यावेळी त्याने कोणताही पश्‍चाताप व्यक्‍त न करता केलेल्या कृत्याचे समर्थन केले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली. त्यामुळे विक्‍कीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याचा हैद्राबाद स्टाइलने एन्काउंटर करा, अशा मागण्या संतप्त जमावाकडून होत होत्या.

नागपूर : हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिच्यावर पेट्रोल फेकून व तिला पेटवून तिचा खून करणारा आरोपी विक्‍की नगराळे याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात ब्लॅकेटच्या चिंधीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, या घटनेला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळाला नाही.

हिंगणघाटमधील प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिला पेटवून देणारा आरोपी विकेश ऊर्फ विक्‍की नगराळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. त्याने 3 फेब्रुवारी रोजी हिंगणघाटमधील नंदोरी चौकात एकतर्फी प्रेमातून तेथील महाविद्यालयात अंशकालीन प्राध्यापिका असलेल्या अंकिता पिसुड्डे या तरुणीवर पेट्रोल फेकून पेटवून दिले होते. सात दिवसांनंतर (ता. 10) नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. 

अंकितावर पेट्रोल फेकल्यानंतर दुचाकीने पसार झालेल्या विक्‍की नगराळेला हिंगणघाट पोलिसांनी चार तासांत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे अटक केली. त्यावेळी त्याने कोणताही पश्‍चाताप व्यक्‍त न करता केलेल्या कृत्याचे समर्थन केले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली. त्यामुळे विक्‍कीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याचा हैद्राबाद स्टाइलने एन्काउंटर करा, अशा मागण्या संतप्त जमावाकडून होत होत्या. त्यामुळे विक्‍कीच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता पोलिस विभागाने विक्‍कीची रवानगी वर्धा जिल्हा कार्यालयातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात केली. विक्‍कीने कारागृहात असताना "आता मला गोळ्या घाला..' असे म्हणत आकांडतांडव केले होते.

- हेच महाराजांचे खरे मावळे... बाईक रॅली थांबवून रुग्णवाहिकेला मोकळी करून दिली वाट

त्याच्या मनस्थितीतही फरक जाणवत होता. त्याच्या वर्तनातील हा बदल पाहता कारागृहात बंदिस्त असताना तो कोणत्याही क्षणी आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकतो, याची कल्पना कारागृह प्रशासनाला आली होती. त्यामुळे त्याच्यावर सतत पाळत ठेवण्यात येत होती, अशी माहिती आहे. 

मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांना एका कोठडीत ठेवण्यात येते. त्यांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लॅंकेट दिल्या जाते. विक्कीला कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी विक्‍कीने ब्लॅंकेटची एक चिंधी फाडली. ती चिंधी कोठडीच्या गजांना बांधून गळ्यात अडकवली. जोरात झटका देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब जेल सुरक्षारक्षकाच्या लक्षात आली. त्यामुळे धावाधाव करीत विक्‍कीचा जीव वाचविण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नशीबाने दिली साथ आणि प्रशांत झाला कोट्यधीश 
 

आरोपी विक्कीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा माझ्याही कानावर आली. पण, ती अफवा आहे. मी स्वतः आरोपी असलेल्या कोठडीला भेट दिली. अशी काहीही घटना घडली नाही, असे माझ्या निदर्शनास आले. 
- अनुप कुमरे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नागपूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hinganghat case accused attempted suicide in prision