
अंकिता मदतीसाठी आरडा-ओरड करत होती. मात्र, कुणीही तिच्या मदतीसाठी धाऊन आला नाही. काही वेळांनी तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि इतर युवकांनी आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर भाजल्याने अंकिताला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नागपूर : आज ३ फेब्रुवारी २०२१... वर्षभरापूर्वी याच दिवशी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात अमानुष जळीत कांड घडले होते. भर दुपारी महाविद्यालयात जात असलेल्या प्राध्यापिकेला माथेफिरू प्रियकराने पेट्रोल टाकून जाळले. या घटनेनंतर राज्यभर संपात व्यक्त करण्यात आला. मोठ-मोठे नेते, उद्योजक शिक्षिकेच्या मदतीसाठी सरसावले. मात्र, तिचा जीव काही वाचला नाही. चला तर जाणून घेऊ या गेल्यावर्षी ३ ते १० फेब्रुवारी या दरम्यान घडलेला थरार...
अंकिता अरुण पिसुड्डे ही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येणाऱ्या दारोडा गावात राहत होती. तिचे आई-वडील व भाऊ असे छोटेसेच कुटुंब होते. वडील शेतकरी तर आई गृहिणी. घरची परिस्थती फार चांगली नसल्याने वेळप्रसंगी अंकिता शेतात जाऊन वडिलांना मदतही करायची. लहान भाऊ शिक्षण घेत होता. त्यांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी फार कष्ट उपसले. कठीण परिस्थितीतही वडिलांनी दोन्ही बहीण-भावाला चांगले शिक्षण दिले.
अंकिताने बॉटनीमध्ये एमएससी केले. आई-वडिलांच्या संघर्षाची जाणीव असल्यानेच अंकिताने नोकरी करण्याचे ठरवले होते. जवळपास तीन वर्षांपूर्वी बऱ्याच प्रयत्नानंतर तिला मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी विषयासाठी तासिका तत्वावर प्राध्यापिकेची नोकरी लागली होती.
घरची परिस्थिती चांगली नसल्याने घरी गाडी नव्हती. त्यामुळे ती कॉलेजमध्ये जाण्यासाठी हिंगणघाटला बसने जात होती. मात्र, सोमवार (३ फेब्रुवारी २०२०) तिच्यासाठी ‘काळा’वार ठरला. हिंगणघाटच्या नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा तिच्याच गावातील विकेश नगराळे (२७) याने तिच्यावर पेट्रोल टाकून जाळले व घटनास्थळावरून पसार झाला.
अंकिता मदतीसाठी आरडा-ओरड करत होती. तिथून जात असलेल्या सहकारी प्राध्यापिका आणि इतर युवकांनी आग विझवून तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर भाजल्याने अंकिताला नागपुरात एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल सात दिवस तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पुन्हा सोमवारच (ता. १० फेब्रुवारी) तिच्यासाठी ‘काळा’वार ठरला आणि तिचा मृत्यू झाला.
आगीत गंभीर जखमी झाल्याने अंकितावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. आगीत तिचे शरीर जवळपास साठ टक्के भाजले होते. यामुळे तिची वाचण्याची शक्यता कमी होती. मात्र, डॉक्टरांनी हिंमत न हरता तिला वाचविण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने १० फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला.
हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याची वार्ता समजताच अनेकांचा रोष अनावर झाला होता. संतप्त नागरिकांनी आरोपी विकेश नगराळेला घटनास्थळी पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची मागणी केली. आता या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला प्रारंभ झाला आहे. जानेवारी महिन्यात ११ ते १३ असे तीन दिवस सुनावणी झाली. आता फेब्रुवारी महिन्यात १५ ते १७ तारखेला सुनावणी होणार आहे.
जाणून घ्या - शेतात रोडग्याचे जेवण करायला गेले, घरी पोहोचले अन् सुरू झाली एकच धावपळ
फेब्रुवारी महिन्यात हिंगणघाट जळीतकांड घडले. यानंतर मार्च महिन्यात देशात कोरोनाच शिरकाव झाला. कोरोनामुळे तब्बल सात महिने कोर्टाचे कामकाज जवळजवळ बंद होते. आता अंकिता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. अंकिताच्या बाजूने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम कामकाज पाहत आहे. या प्रकरणाचा काय निकाल लागतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.