वाळू तस्करांचे पाॅवरफुल नेटवर्क महसूलला जुमानेना, म्हणून एलसीबीने धरली कमान, मात्र ते घाटाखाली कधी उतरणार?

sand mafia in buldana.jpg
sand mafia in buldana.jpg

बुलडाणा : गेल्या अनेक महिन्यांपासून वाळू तस्करांचे जाळे ठिकठिकाणी विनल्या गेले असून, त्यांची संपर्क यंत्रणा आणि कायद्याचा नसलेला धाक पाहता रात्रीच्या अंधारात सुसाट वेगाने तस्करीची मोहिम राबविल्याचे चित्र आहे. यातच या तस्करांनी चक्क चिरडून एका पोलिस कर्मचार्‍याचा जीव घेण्याची हिमत केल्याचा प्रकार जलंब येथे नुकताच घडला. परंतु, अद्यापही त्यांचे पॉवरफुल नेटवर्क तोडण्यासाठी महसूल प्रशासनाला यश आले नाही.

यावर पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सक्त अशी भूमिका घेत एलसीबीच्या माध्यमातून कारवाईचा सपाटा लावला आहे. याअंतर्गत अंढेरा येथे मोठी कारवाई एलसीबीने केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. परंतु, आता ते घाटाखाली कधी उतरणार असाही प्रश्‍न निर्माण केला जात आहे. वाळू तस्करांच्या मार्गावर असलेल्या उमेश सिरसाट या पोलिस कर्मचार्‍याचा जीव घेत वाळू तस्करांनी कळस गाठला. यानंतर पोलिसांनी सर्वत्र सतर्क असल्याचे दाखविले खरे परंतु ते केवळ घाटावरच दिसून आले. 

वाळू तस्करांचा खरा हब हा घाटाखालील जळगाव जामोद, नांदुरा, जलंब परिसरात असून, राजरोसपणे वाळू तस्करांचे वाहने रात्र होतच सुसाट वेगाने आजही मोठ्या संख्येने धावत आहे. महसूल प्रशासन तर यांना रोखण्यासाठी अपुरी पडत असून, स्थानिक पोलिस प्रशासनही त्यांच्याकडे लाभापोटी कानाडोळा करत आहे. यामुळे अजून किती प्रामाणित कर्मचार्‍यांचे जीव गेल्यावर अधिकार्‍यांना जाग येईल असा सवाल आता निर्माण होत आहे. पोलिस यंत्रणेपेक्षाही तगडे संपर्क नेटवर्क सध्या पूर्णा काठच्या वाळू तस्करांचे झाले आहे. पोलिस किंवा महसूल विभागाची गाडी निघण्याच्या अगोदरच नदीपात्रात याची माहिती पोचलेली असते.

कोणते अधिकारी आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे याची टप्याटप्याची माहिती या तस्करांपर्यत पोचलेली असते. यामध्ये काही रोजंदारीवर कर्मचार्‍यांची सोय होऊन अधिकार्‍यांना रसद पोचत असल्यामुळे ही यंत्रणा इतकी मजबूत होते. परंतु, गस्तीवर असलेले अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालत कर्तव्य प्रमामाणिकपणे करत असतात. घाटाखालील जळगाव जामोद, नांदुरा, जलंब, भास्तन, माटरगाव परिसरात राजरोसपणे दररोज अंदाजे 40 ते 50 टिप्पर, ट्रक सुसाट कुणाच्याही जिवाची पर्वा न करता वाळू तस्करी करतात. परंतु, त्यांना स्थानिक पोलिस प्रशासन का वेसन घात नाही याबाबतचे कोडे सर्वसामान्यांना पडले आहे.

तो व्हीडीओ व्हायरल
रात्रीचा काळाकुट अंधार एक पांढर्‍या रंगाची ब्रेझा येऊन थांबते. त्यापाठीमागे एक वाळूचे टिप्पर थांबून काही वेळाने एक व्यक्ती त्यातून उतरतो आणि चालकाजवळ जातो. त्यानंतर चालक टिप्परमधून उतरतो आणि गाडीजवळ जाऊन काही देतो आणि काही क्षणातच दोन्ही वाहने निघून जातात. असा घटनाक्रम असलेला एक व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, यामध्ये कसली देवाणघेवाण झाली आणि ती ब्रेझा कुणाची असा सवाल आता निर्माण झाली आहे.

व्यर्थ ना जावो ते बलिदान
जीवाची पर्वा न करता वाळू तस्करांच्या मार्गावर कर्तव्य बजावत असताना उमेश सिरसाट यांचा जीव गेला. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घाटाखालील हब कडेही लक्ष केंद्रित करत एका कर्मचार्‍याचे बलिदान व्यर्थ न जातो या दिशेने तस्करीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com