याची टोपी त्याला नि त्याची टोपी याला...

frod
frod

नागपूर : पैसा बुरी बला है... म्हणतात, तेच खरे. पैश्‍यासाठी लबाड माणसे काय करतील, याची कल्पना करणेही कठीण. प्लॉट आणि फलॅट विक्रीच्या धंद्यात तर सर्रास फसवणुकीच्या घटना घडतात. सध्या तर या फसवणुकीच्या घटनांनी कहर केला असून शहरात भूखंड बळकाविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, त्यांची वृद्ध आणि निराधारांच्या भूखंडावर नजर आहे.

या टोळ्या जिवंत व्यक्‍तीला मृत दाखवून बनावट वारसदार निबंधक कार्यालयात उभे करते. वारसदाराची बनावट कागदपत्रे जोडून भूखंडावर कब्जा केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना वाठोडा परिसरात उघडकीस आली. बनावट दस्तावेजाद्वारे भूखंड विक्री करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून वाठोडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश सुधाकर कुळकर्णी, भीमराव सागर वागदे (34) रा. पांजरी, अश्विन अशोक वंजारी (31) रा. चंदननगर आणि विकास जेम्स चौरे रा. इंदिरानगर, इमामवाडा अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना सुधाकर कुळकर्णी (72, रा. जयप्रकाशनगर, सोनेगाव) असे तक्रारदार वृद्धेचे नाव आहे. त्यांचे पती राज्य कामगार विमा विभागात कार्यरत होते. गेल्या काही वर्षांपासून त्या पतीसह पुणे येथे राहात होत्या. त्यांनी आराधनानगरमध्ये मौजा दिघोरी येथील खसरा क्रमांक 23 मध्ये 13 क्रमांकाचे भूखंड खरेदी केले होते. 2017 पर्यंत त्यांनी भूखंडाची पाहणी केली असता ते कायम होते. त्यानंतर आरोपींनी भावना कुळकर्णी यांना वारस नसल्याचे बघून त्या भूखंडाचे बनावट दस्तावेज तयार केले. त्या दस्तावेजाच्या आधारावर आममुखत्यार पत्र तयार करून त्याचे वेगवेगळया लोकांना विक्रीपत्र केले. शेवटचे विक्रीपत्र मोहाडीकर नावाच्या व्यक्तीच्या नावाने झाले असून ते त्या ठिकाणी घर बांधत आहेत. भावना कुळकर्णी अचानकपणे नागपुरात आल्या असून पुतण्याकडे थांबल्या आहेत. पुतण्याला घेऊन त्या भूखंड बघण्यासाठी गेल्या असता त्या ठिकाणी बांधकाम सुरू दिसले. त्यांनी चौकशी केली असता 2016 पासून भूखंडाची विक्री वेगवेगळया व्यक्तींना करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com