सुरू होते 'जाम पे जाम', पळता पळता फुटला घाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जानेवारी 2020

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : पिनेवालोंको पिनेका बहाना चाहिये, म्हणतात ते खरेच आहे. होळी, नववर्ष हे तर पिणाऱ्यांसाठी हक्‍काचे दिवस. याचाच प्रत्यय दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आला. नवीन वर्षाच्या स्वागत करायला एकत्र आलेला मित्रांचा घोळका. हातात दारूचा पेग अन्‌ सोबत चकना घेत आपल्या विश्‍वात रंगला असतानाच पोलिस आले. मग काय काहींनी दारूचा ग्लास तिथेच सोडला तर काहींनी दारूची बाटली खिशात टाकत सैरावैरा धूम ठोकली. तळीरामांची ही अवस्था पाहून बघ्यांना मात्र हसू आवरले नाही. 30 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर हा प्रकार घडला.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : पिनेवालोंको पिनेका बहाना चाहिये, म्हणतात ते खरेच आहे. होळी, नववर्ष हे तर पिणाऱ्यांसाठी हक्‍काचे दिवस. याचाच प्रत्यय दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आला. नवीन वर्षाच्या स्वागत करायला एकत्र आलेला मित्रांचा घोळका. हातात दारूचा पेग अन्‌ सोबत चकना घेत आपल्या विश्‍वात रंगला असतानाच पोलिस आले. मग काय काहींनी दारूचा ग्लास तिथेच सोडला तर काहींनी दारूची बाटली खिशात टाकत सैरावैरा धूम ठोकली. तळीरामांची ही अवस्था पाहून बघ्यांना मात्र हसू आवरले नाही. 30 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी तणसीच्या ढिगात लपविलेला तब्बल अडीच लाख रुपयांचा दारूसाठा जप्त केला.

जिल्ह्यात दारुबंदीला चार वर्षे पूर्ण झाली असली तरी ही दारूबंदी फुसकीच ठरली आहे. गावागावांत दारूच दारू उपलब्ध आहे. पोलिस कारवाई करतात. पण दारूविक्रेत्यांकडून नवनवीन युक्‍त्या लढवून पुन्हा दारूविक्री केली जाते.
तहसील कार्यालयासमोर एका हॉटेलमध्ये अनेक तळीराम मद्य प्राशन करीत असल्याची माहिती मिळाली. यानंतर ठाणेदार संदीप धोबे कर्मचाऱ्यासह त्याठिकाणी पोहोचले. पोलिस येत असल्याची माहिती मिळाल्याने कोणी दारूचा पेला तसाच सोडून तर कुणी खिशात दारूची बाटली घेत सैरावैरा पळ काढला.

हेही वाचा - थर्टी फर्स्टच्या रात्री सुरू होती झिंगाट पार्टी अन्‌ शेतात घडले असे...

या तळीरामांमध्ये बहुतांश शासकीय कर्मचारी होते. मिळेल त्या वाटेने तळीराम पळत असल्याने उपस्थित नागरिकांना हसू आवरले नाही. ठाणेदार धोबे आल्यानंतर त्यांनी लगतच्या पानठेल्यात तपासणी केली. तिथे दारूच्या वीस बाटल्या आढळल्या. मग पानठेलाचालक लहू शिवणकर, हॉटेलचा मॅनेजर नितीन अलगमकर यांची कसून तपासणी करण्यात आली. यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या तणशीच्या ढिगात विविध कंपनीच्या दारूच्या 18 पेट्या आढळून आल्या. हा संपूर्ण माल जप्त करण्यात आला.

क्लिक करा - बापरे... चोरट्यांनी केले एटीएम लंपास

या दारूची किमत 2 लाख 58 हजार रुपये एवढी आहे. अलगमकर, शिवणकर यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता हा दारूचा माल हॉटेलचालक राकेश नगारे याचा असल्याचे समोर आले. सध्या राकेश नगारे पसार असल्याची माहिती आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात विजयकुमार कोमल्ला, करमचंद दुर्गे, विजय पवार, देवेंद्र कटरे, विलास कोवे, प्रफुल्ल कांबळे यांनी ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police raid on liquor at gondpipri