वन्यजीवांपासून पिकांच्या रक्षणासाठी त्याची "ही' आयडीया ठरली यशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

मूळचा नागपूरचा व सध्या गोंडपिपरीत स्थिरावलेला भूषण खोत विहीरगाव येथे गेल्या दोन वर्षांपासून आठ एकर शेतीत उत्पादन घेत आहे. मागीलवर्षी पहिल्यांदा त्याने शेतीची कास हातात घेतली. निसर्गाने साथ दिली. चांगले उत्पन्न होणार या आनंदात तो होता. पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना वन्यजीवांनी त्याच्या शेतीची प्रचंड नासधूस केली.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : मागील वर्षी अगदी हातात येणारे पीक वन्यजीवांच्या हैदोसाने उद्‌ध्वस्त झाले होते. पहिल्यांदाच शेती करणाऱ्या एका युवा शेतकऱ्याला यामुळे मोठा फटका बसला. परंतु, त्याने हार मानली नाही. शेतीत वन्यजीवांच्या हैदोसाला आवर घालण्यासाठी त्याने नंतर एक भन्नाट आयडिया राबविली. एम्ल्पिफायर, मेमरी कार्ड व भोंग्याच्या सहाय्याने विविध प्राण्यांचे आवाज काढून तो जंगली प्राण्यांना शेतातील पिकापासून दूर ठेवत आहे. 

शेती करताना शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पाऊस चांगला आला अन्‌ निसर्गाने साथ दिली तरी शेतातील पिकाचे वन्यजीवांकडून होणारे नुकसान हा अतिशय गंभीर प्रश्‍न उभा राहतो. अशावेळी वन्यजीवांकडून पीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करतात. काही शेतकरी नाईलाजाने कुंपणात वीज प्रवाह सोडतात किंवा एखाद्या मृत पाळीव जनावरावर थिमेट वा इतर विषारी पर्यायाचा वापर करतात. त्यामुळे यात कधी वन्यजीवांचा तर कधी मानवाचाही बळी गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 

वन्यजीवांनी पिकांचे केलेल्या नुकसानीमुळे तो झाला होता व्यथित

मूळचा नागपूरचा व सध्या गोंडपिपरीत स्थिरावलेला भूषण खोत विहीरगाव येथे गेल्या दोन वर्षांपासून आठ एकर शेतीत उत्पादन घेत आहे. मागीलवर्षी पहिल्यांदा त्याने शेतीची कास हातात घेतली. निसर्गाने साथ दिली. चांगले उत्पन्न होणार या आनंदात तो होता. पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना वन्यजीवांनी त्याच्या शेतीची प्रचंड नासधूस केली. यात त्याचे मोठे नुकसान झाले. पण हार न मानता त्याने यंदाही शेती केली. धानाचा काळ संपल्यानंतर आता भूषणने आपल्या आठ एकर शेतात हरभरा व गहू लावला आहेत. मागीलवर्षी वन्यजीवांकडून पिकांच्या झालेल्या नुकसानीने तो व्यथित होता. 

अवश्‍य वाचा- येथे साकारला जातोय भारतातील पहिला काचेचा स्कायवॉक 

केवळ अडीच हजार रुपये खर्च

अशात त्याने वन्यप्राणी आपल्या शेतात येऊ नये यासाठी एक आयडिया केली. त्याने एक एम्ल्पिफायर घेतला व साधारणतः दहा लाऊडस्पिकर (भोंगे) घेतले. ते भोंगे त्याने शेतीच्या धुऱ्यावर लावले. आपल्या शेतातील मीटरवरून वीज प्रवाहाने एम्ल्पिफायर व भोंग्यांना एकमेकांना जोडले. यानंतर माणसांचा, कुत्र्यांचा, फटाक्‍यांचा व भयावह अशा अनेक आवाजाचे रेकॉर्डिंग केले. ते एका मेमरीकार्डमध्ये सेट केले. रोज रात्री त्याच्या शेतात असे विविध आवाज गुणगुणतात. या आवाजाने जेव्हापासून ही सिस्टीम शेतात लावली तेव्हापासून एकही वन्यजीव शेतात पिकांची नासाडी करायला भटकला नाही. विशेष म्हणजे ही सिस्टिम तयार करायला केवळ अडीच हजार रुपये खर्च आला आहे. 

आता एकही वन्यप्राणी शेताकडे भटकत नाही

शेतातून येणारे आवाज बघून अनेकजण चकित अन्‌ भयभीतही झाले. पण वन्यजीव हाकलण्याचा हा प्रयोग असल्याचे नंतर लक्षात आले. वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरीबांधव विविध प्रयोग करण्यासोबतच रात्ररात्र जागतात. पण तरीदेखील रानडुकरे, वाघ, हरीण यांसारखे वन्यजीव शेतात येतातच. विशेषत: रानडुकरे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. यावर भूषणने केलेली आयडिया कमालीची यशस्वी ठरली आहे. रात्री वन्यजीवांसाठी तर सायंकाळी पशूपासून पिकांची सुरक्षा करण्यासाठी हा प्रकार कमाल करणारा ठरला आहे. यापासून वन्यजीव शेतात येत नसल्याने त्यांच्या सुरक्षेसोबतच पिकांचीही सुरक्षा होत आहे. 

वनविभागाने करावी जनजागृती 

गोंडपिपरी तालुक्‍यात गेल्या चार महिन्यांत शेतात एक वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. तर चेकबोरगावजवळ वीज प्रवाहाने दोन रानहल्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. अशावेळी भूषण खोत याच्या या प्रयोगाची वनविभागाने प्रचार-प्रसार केला तर वन्यजीवांच्या संरक्षणासोबतच मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यास मोठी मदत होईल. 

वन्यजीवांच्या हैदोसाने मागीलवर्षी शेतीचे मोठे नुकसान झाले. यंदा हे नुकसान होऊ नये म्हणून आवाजाचा हा प्रयोग राबविला. गेल्या महिनाभरापासून हा उपक्रम सुरू असून आता वन्यजीव शेतीकडे भटकतही नाही. या प्रयोगामुळे शेतीचे नुकसान टाळण्यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यास बरीच मदत मिळेल. 
-भूषण खोत, 
युवा शेतकरी, विहीरगाव. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: His "Idea" is successful in protecting crops from wildlife