जाणून घ्या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणा-या शिवबांचा वैभवशाली इतिहास...

shivaji maharaj
shivaji maharaj

नागपूर : छत्रपती शिवाजीराजे भोसले (19 फेब्रुवारी 1630 ते 3 1680एप्रिल ) हे इ. स. 1818 पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधत. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.

महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्‍चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ. स. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार. 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांमध्ये वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.

एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.

शहाजीराजे
प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ. स. 1636 मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रानी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

जिजाबाई
जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com