या जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास उतरतोय कागदावर, वाचा काय ते...

The history of Wardha district will come in book form
The history of Wardha district will come in book form

वर्धा : सर्वगुणसंपन्न असा विदर्भाचा नावलौकिक असला तरी त्याचे दस्तऐवजीकरण झालेले नाही. ही बाब हेरत काही प्रगल्भ लेखकांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण इतिहासाचा मागोवा घेत त्यात वर्तमान प्रमुख घडामोडींचेही संकलन करीत विदर्भाची इत्यंभूत माहिती कागदावर उतरण्याचे कार्य सुरू केले आहे. यात वर्धा जिल्ह्याचा इतिहासही पुस्तक रूपात येणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकला, प्रबोधनाचा वसा देणारे संतांचे कार्य, विविधतेने नटलेला निसर्ग व वैशिष्ट्यपूर्ण लोकजीवन असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या प्राचीन राजवटीपासून ते आजच्या राजकारणापर्यंत, संत चळवळीपासून आजच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीपर्यंत आणि विनोबा-गांधीजींच्या आगमनापासून ते जिल्ह्याची स्वातंत्रोत्तर वाटचाल यात अधोरेखित केली जाणार आहे.

प्राचीन, मध्ययुगीन साहित्य निर्मितीचा आजच्या काळाशी संबंध साधला जाणार आहे. सांस्कृतिक पर्यावरणाचा साक्षेपी साधार, चिकित्सक वेध घेण्याचे महत्त्वाकांक्षी आणि धाडसी कार्य विदर्भातच युद्धपातळीवर सुरू असून, विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास कागदावर जिवंत होत आहे. या स्मृतिरूप इतिहासाचे ग्रंथरूपाने दस्तऐवजीकरण होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या संकल्पनेतून व समीक्षक डॉ. अजय देशपांडे यांच्या संपादनात हा प्रकल्प सुरू आहे. पुणे येथील अनुबंध प्रकाशन हे या प्रकल्पाचे प्रकाशक आहेत.

या स्मृतिरूप ग्रंथात विदर्भातील जिल्ह्यांचा इतिहास आठ खंडात समाविष्ट केला जात आहे. यात वर्धा जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात गेल्या साडेचार दशकाचे जाणकार, अभ्यासक, साहित्यिक डॉ. राजेंद्र मुंढे यांच्यावर संपादक मंडळाने सोपविली आहे. आपल्याकडे इतिहास लेखनाची परंपरा तेवढी उत्साहवर्धक नाही. त्यामुळे स्मृतिरूप इतिहास कालौघात धूसर आणि अपभ्रंषित होत असतो. म्हणून तो लिहिला गेला पाहिजे आणि तो साधार आणि सापेक्ष लिहिला जावा म्हणून डॉ. मुंढे यांनी आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्ती, इतिहासाचे जाणकार, स्वातंत्र्य सैनिक, कार्यकर्ते तसेच ज्यांच्याकडे वर्धा जिल्ह्याची माहिती, दुर्मिळ कागदपत्रे, छायाचित्रे, नकाशे आदी असेल त्यांनी ती द्यावी. त्यांनी दिलेल्या माहितीचा लेखन कार्यात उपयोग झाल्यास त्यांचा स्पष्टपणे नामनिर्देश केला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com