वारकऱ्यांचा संविधानाची प्रत देऊन सन्मान! इर्विन चौकात झाला सोहळा | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yashomati Thakur

वारकऱ्यांचा संविधानाची प्रत देऊन सन्मान! इर्विन चौकात झाला सोहळा

अमरावती : कौंडण्यपूर येथून निघालेल्या माता रुक्मिणीच्या पालखीचे माजी मंत्री यशोमती ठाकूर मित्रमंडळाच्या वतीने बियाणी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. सामाजिक सलोखा जपत यावर्षी प्रथमच या पायदळ दिंडीचे येथील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत सर्व वारकऱ्यांचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने संविधान भेट देऊन सन्मान करण्यात आला.

कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे निघालेली माता रुक्मिणीची पालखी सायंकाळी सात वाजता अमरावती शहरात दाखल झाली. दरवर्षी प्रमाणे माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी बियाणी चौकात पालखीचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रशासनातील अधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही वारी दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुढे अंबादेवी मंदिराकडे मार्गस्थ होते.

तेव्हा या वारीच्या प्रमुखांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले पाहिजे आणि समस्त आंबेडकरी समाजाने सुद्धा या वारकऱ्यांचे स्वागत व सन्मान केला पाहिजे, अशी कल्पना अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे चळवळीतील कार्यकर्त्यांनी मांडली. तेव्हा यशोमती ठाकूर यांनी धार्मिक भावनांचा आदर करीत हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची शिकवण व समता, बंधुता संविधानिक भूमिका असली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

त्यामुळे यावर्षी पहिल्यांदाच या पालखीसह वारकऱ्यांचे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी वारीचे प्रमुख संजय ठाकरे महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. तत्पूर्वी त्यांचा पुष्पहार घालून संविधान भेट देत सन्मानदेखील करण्यात आला.

याप्रसंगी माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, सहकार नेते हरिभाऊ मोहोड, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, भय्या पवार, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुकद्दर पठाण, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष प्रवीण मनोहर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, तिवस्याचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, प्रा. जगदीश गोवरधन, पंकज मेश्राम, रितेश पांडव, पंकज देशमुख, भीम ब्रिगेडचे राजेश वानखेडे, प्रवीण आकोडे, राजाभाऊ गवई, नरेंद्र मकेश्वर, सागर कलाने, समीर जवंजाळ आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.