गडचिरोलीत धानपिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

मिलिंद उमरे
Saturday, 10 October 2020

प्रादुर्भावग्रस्त झाडावर साखरेच्या पाकासारखा चिकट द्रव आढळून येतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पोषक वातावरणात हा प्रादुर्भाव वाढून संपूर्ण शेतामध्ये पसरतो. तुडतुड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी वाजवीपेक्षा नत्र खताचा अधिक वापर करू नये.

गडचिरोली : जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील धानपिकावर तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या रोगाचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर यांनी केले आहे. 

धान पिकावर तपकिरी, पांढऱ्या पाठीचे व हिरवे तुडतुडे प्रादुर्भाव करताना आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे अधिक नुकसानकारक असतात व त्यांचा प्रादुर्भाव वाढत्या प्रमाणात दिसून येतो. हिरव्या लुसलुशीत दाटलेल्या पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. तसेच 

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुडतुड्यासाठी पोषक वातावरण असते. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढून जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. तुडतुडे प्रौढ व पिल्ले खोडावर समूहाने राहून खोडातील रस शोषण करतात. त्यामुळे झाड पिवळे व कमकुवत होते. झाडांची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या शेंड्यावर विपरीत परिणाम होऊन दाणे भरण्याच्या प्रक्रियेत बाधा उत्पन्न होते. या तुडतुड्यांमुळे झाडामध्ये विषाणूंची लागण होते. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पीक गवतासारखे दिसते. तसेच वरच्या भागात धान करपला जातो. जास्त प्रादुर्भाव असल्यास प्रामुख्याने शेताच्या मध्यभागी पीक करपल्याने करपल्याने गोलाकार खड्डे पडतात. झाडे पिवळी पडून करपतात. त्यामुळे उत्पन्न होत नाही. याच तुडतुड्यांनी झाडाच्या मुळाशी हल्ला केल्यास झाडे उन्मळून पडतात. 

हेही वाचा - ऑनलाइन फसवणूक : उसनवारी घेऊन मोबाईल मागवला, पण मोबाईलही आला नाही अन् मुलगाही गमावला

बरेचदा प्रादुर्भावग्रस्त झाडावर साखरेच्या पाकासारखा चिकट द्रव आढळून येतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. पोषक वातावरणात हा प्रादुर्भाव वाढून संपूर्ण शेतामध्ये पसरतो. तुडतुड्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी वाजवीपेक्षा नत्र खताचा अधिक वापर करू नये. टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांच्या वापर करावा. प्रादुर्भाव झाल्यास शेतातील पाणी सोयीनुसार 3 ते 4 दिवसांसाठी बाहेर सोडावे. प्रादुर्भाव सुरू झाल्याबरोबर मेटॅरायझियम अनिसोप्ली 1.15 टक्‍के भुकटी या जैविक बुरशीचा 2.5 किलो हेक्‍टर या प्रमाणात शेतामध्ये वापर करावा. ही भूकटी 10 ते 15 किलो कुजलेल्या शेणखताच्या पावडरमध्ये चांगली मिसळावी आणि 1 ते 2 दिवस झाकून ठेवावी. त्यामुळे त्यामध्ये या जैविक बुरशीची वाढ होऊन त्याची परिणामकारकता वाढते. आवश्‍यकता भासल्यास परत 15 दिवसांनी परत या जैविक बुरशीचा वापर करावा, असेही सुचविण्यात आले आहे.

हेही वाचा - टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांना टिकावू शिक्षण; विनोदी 'वऱ्हाडी' बोलीभाषेतून विद्यार्थी...

असा करावा बंदोबस्त -
तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच नियंत्रणासाठी बुप्रोकेजीन 25 टक्‍के प्रवाही 16 मिली लिटर किंवा इमिडॅक्‍लोप्रीड 17.8 टक्‍के 2.2 मिली लिटर किंवा फिप्रोनिल 5 टक्‍के 20 मिली लिटर किंवा ट्रायझोफॉस 40 टक्‍के प्रवाही 12.50 मिली लिटर किंवा इथोफेनप्रॉक्‍स 10 टक्‍के प्रवाही 10 मिली लिटर फ्लोनीकॅमीड 50 टक्‍के 3 ग्रॅम किंवा थायोमेथाक्‍झाम 25 दाणेदार 2 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hopper attacked on rice crop in gadchiroli