esakal | ऑनलाइन फसवणूक : उसनवारी घेऊन मोबाईल मागवला, पण मोबाईलही आला नाही अन् मुलगाही गमावला
sakal

बोलून बातमी शोधा

student suicide due to online fraud in chandrapur

सध्या कोरोनामुळे महाविद्यालय बंद आहे. ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरू आहे. रोहित बाराव्या वर्गाचा विद्यार्थी होता. ऑनलाइन शिकवणी वर्गासाठी त्याने ऑनलाइन मोबाईल बोलविला.

ऑनलाइन फसवणूक : उसनवारी घेऊन मोबाईल मागवला, पण मोबाईलही आला नाही अन् मुलगाही गमावला

sakal_logo
By
राजेंद्र जाधव

आंबोली (जि. चंद्रपूर): बाराव्या वर्गातील विद्यार्थ्याच्या ऑनलाइन शिकवणी वर्गासाठी कुटुंबीयांनी पदरमोड करून मोबाईलसाठी पंधरा हजार रुपयांची तजवीज केली. ऑनलाइन मोबाईलची ऑर्डर दिली. मात्र, पार्सल हाती आले तेव्हा कुटुंबीयांसह विद्यार्थ्यालाही धक्का बसला. भ्रमणध्वनीऐवजी दोन पॉकेट आणि पुठ्ठा, अशा वस्तू पार्सलमध्ये होत्या. पैसे गेले आणि मोबाईलही आला नाही, याचा धक्का बसल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चिमूर तालुक्‍यातील पुयारदंड येथे आज (ता.10) घडली. रोहित राजेंद्र जांभुळे, असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

सध्या कोरोनामुळे महाविद्यालय बंद आहे. ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरू आहे. रोहित बाराव्या वर्गाचा विद्यार्थी होता. ऑनलाइन शिकवणी वर्गासाठी त्याने ऑनलाइन मोबाईल बोलविला. त्याचे पंधरा हजारांपैकी दहा हजार रुपये संबंधित कंपनीला ऑनलाइन दिले. उर्वरित पाच हजार रुपये भ्रमणध्वनी आल्यानंतर द्यायचे होते. घरीच परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामुळे पाच हजारांची जुळवाजुळव कशी करायची या विवंचनेत रोहित होता

हेही वाचा -कोरोना – एक विदारक अनुभव; कोरोनावर मात केलेल्या एका कर्तव्याप्रिय गृहिणीचे मनोगत   

दरम्यान, त्याला गावातील डाक कार्यालयातून पार्सल आल्याचा निरोप आला. ते सोडविण्यासाठी पाच हजार रुपयांची गरज होती. शेवटी रोहितने शिकवण्यासाठी मोबाईल आवश्‍यक असल्याचे आईला पटवून दिले. आईने उसनवारी करून पाच हजार रुपये त्याच्या हातावर ठेवले. त्यानंतर पार्सल घरी आले. आई आणि रोहीतने ते उघडून बघितले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्या पार्सलमध्ये मोबाईलऐवजी दोन पॉकेट, एक बेल्ट अशा वस्तू होत्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोहितने संबंधित कंपनीशी दुसऱ्याच्या मोबाईलवरून संपर्क केला. परंतु, त्याचा कंपनीशी संपर्कच झाला नाही. दिलेला क्रमांक बंद होता. पंधरा हजार रुपये गेले आणि मोबाईल याचा मोठा धक्का मायेलकांना बसला. याच धक्‍क्‍यातून रोहित गुरुवारी दुपारी तीन वाजता घरातून निघून गेला. 

हेही वाचा - मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून...

आई-वडिलाने मित्रांकडे विचारपूस केली. त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. शुक्रवारला गावकरी शेतात जात असताना रोहीतचे कपडे विहिरीजवळ दिसले. त्यांनी विहिरीत डोकावून बघितले. तेव्हा त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. रोहितने आत्महत्या करण्यासाठीच विहिरीत उडी मारली. त्याने विहिरीत उडी घेताना स्वत:ला दगड बांधले होते. ऑनलाइन फसवणुकीने एका युवकाचा जीव गेल्याने पुयादरंडमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.