गोंदियाच्या या रुग्णालयात फरशीवरच लावली जाते रुग्णांना सलाइन...दिव्याखाली अंधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

उल्लेखनीय म्हणजे, खाली फरशीवर बेड अंथरूण एका रुग्णाला सलाइन लावण्यात आली. इतकी विदारक अवस्था या रुग्णालयात दिसून येत आहे. दरम्यान, प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन रुग्णांच्या जिवाशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.

गोंदिया : गरीब रुग्णांकरिता आशेचा किरण असलेल्या येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून येत आहे. कोरोनासदृश आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून अन्य आजाराच्या रुग्णांना एकाच म्हणजे वॉर्ड क्रमांक पाचमध्ये भरण्यात आले आहे. काहींना बेडचीदेखील व्यवस्था करून देण्यात आली नाही; तर काही रुग्णांना खाली फरशीवरच सलाइन लावली जात आहे.

 

गोंदिया शहराच्या मध्यभागी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुसज्ज इमारत आहे. या रुग्णालयात विविध आजारांवर औषधोपचार केले जात आहेत. हे रुग्णालय गरिबांसाठी एक आशेचे किरण ठरले आहे. परंतु, सद्यःस्थितीत रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. खऱ्या अर्थाने रुग्णांवर औषधोपचार होईल की नाही, हे सांगता येतच नाही.

 

अन्य आजाराच्या रुग्णांकडे दुर्लक्ष

गोंदिया जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशाची सीमा आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील रुग्ण आणि नातेवाईक केटीएस रुग्णालयाची वाट पकडत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, नानाविध आजारांनी डोके वर काढले आहे. त्यातच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने भीती दूर करण्यासाठीदेखील अनेकांचे पाऊल या रुग्णालयाकडे पडत आहेत. परंतु, कोरोनासदृश आजाराचे रुग्ण वगळता अन्य आजाराच्या रुग्णांकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

फरशीवरच रुग्णांची सोय

कोरोनासदृश आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून रुग्णालय प्रशासनाने चार वॉर्ड खुले केले आहेत. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये कोरोनासदृश आजाराचे रुग्ण वगळता सगळ्याच आजारांच्या रुग्णांना भरले आहे. कोणाला बेडची व्यवस्था आहे, तर कोणाला खाली फरशीवरच झोपावे लागत आहे. त्यांच्याकरिता पर्यायी कोणतीही व्यवस्था रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप करण्यात आली नाही.

सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा

रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइंकामध्ये सोशल डिस्टन्सिंग कुठेच दिसून येत नाही. त्यामुळे आजार पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, खाली फरशीवर बेड अंथरूण एका रुग्णाला सलाइन लावण्यात आली. इतकी विदारक अवस्था या रुग्णालयात दिसून येत आहे. दरम्यान, प्रशासनाने ताबडतोब दखल घेऊन रुग्णांच्या जिवाशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : कोरोनामुक्त होऊनही करते ती लोकांच्या टोमण्यांचा सामना; कुटुंबालाही केले बहिष्कृत...

लवकरच तोडगा काढला जाईल
कोवीड-19 करिता चार वॉर्ड ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे जागा अपुरी पडत असल्याने अन्य आजाराच्या रुग्णांना एकाच वॉर्डात हलविण्यात आले आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल. सगळं सुरळीत, सुव्यवस्थित होईल.
- डॉ. रामटेके, जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This hospital in Gondia is inconvenient for the patients