पै-पै करून लाखोने जमविले अन् आगीत सर्व स्वाहा झाले...

सिद्धार्थ गोसावी
Monday, 31 August 2020

गडचांदूर शहरातील विद्यानगरी वॉर्ड क्रमांक पाचमध्ये अशोक माटे यांचे घर आहे. घरासमोरील शेडमध्ये ते फर्निचरचे काम करीत होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घराला आग लागल्याची बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली.

कोरपना (जि. चंद्रपूर) : गडचांदूर येथील वॉर्ड क्रमांक पाचमधील माटे फर्निचरचे संचालक अशोक माटे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत घरासह घरातील लाखो रुपयांचे मौल्यवान साहित्य जळून खाक झाले.

ही घटना रविवारी (ता. ३०) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी धाव घेत माणिकगड सिमेंट कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग आटोक्‍यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अवश्य वाचा- काय सांगता या गावात पडला चक्क मासोळ्यांचा पाऊस...
 

गडचांदूर शहरातील विद्यानगरी वॉर्ड क्रमांक पाचमध्ये अशोक माटे यांचे घर आहे. घरासमोरील शेडमध्ये ते फर्निचरचे काम करीत होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घराला आग लागल्याची बाब शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर माटे कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात आगीची माहिती दिली. पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन माणिकगड सिमेंट कंपनीकडे अग्निशमन दलाची मागणी केली.

अवश्य वाचा- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे का थांबले अर्थचक्र ... वाचा, हे आहे कारण 
 

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, आगीत प्लायवूड, मशीन, तीन मोटारसायकली व अन्य साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, माटे कुटुंबीयांचे सुमारे 16 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल भारती करीत आहेत.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House of a carpenter destroyed in the fire