esakal | अत्यावश्‍यक सेवेच्या स्टिकर्सचा असा होतोय दुरुपयोग, या जिल्ह्यात नागरिक घेताहेत गैरफायदा
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

खोटी एकापेक्षा एक कारण देऊन नागरिक बाहेर पडत आहेत. इतकेच नव्हे तर अत्यावश्यक सेवेसाठी तयार करण्यात आलेले स्टिकर वाहनावर लावून त्याचा दुरुपयोग होताना दिसून येत आहेत.

अत्यावश्‍यक सेवेच्या स्टिकर्सचा असा होतोय दुरुपयोग, या जिल्ह्यात नागरिक घेताहेत गैरफायदा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि.बुलडाणा) : सकाळी 12 वाजेपर्यंत जीवनवश्यक वस्तू खरेदी करण्याची वेळ असल्याने सगळे एकाच वेळी किराणा माल घेण्यासाठी बाहेर पडत आहेत, मित्रांना भेटायला जात आहेत. अत्यावश्यक स्टिकर्सचा गैरफायदा घेण्याचे काम केले जात असून, कारवाई करणारे पोलिस बांधव याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घरातच बसा असे आवाहन करून देखील नागरिक बेशिस्तपणा दाखवत घराबाहेर पडू लागले आहेत. यात अनेकांकडून किराणा माल घेण्यासाठी, औषधी खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे कारण सांगितले जात आहे. डाॅक्टरकडे निघालो आहे, औषध आणायला जातो, घरातील सर्व किराणा संपला, साहेब गॅस सिलिंडर घेऊन येतो. अशी खोटी एकापेक्षा एक कारण देऊन नागरिक बाहेर पडत आहेत. इतकेच नव्हे तर अत्यावश्यक सेवेसाठी तयार करण्यात आलेले स्टिकर वाहनावर लावून त्याचा दुरुपयोग होताना दिसून येत आहेत. 

हेही वाचा - करा इम्यूनिटी टाईट आणि जिंका कोरोनाशी फाईट

यात काही बहाद्दर मागील वर्षीचे प्रिस्क्रिप्शन घेऊन बाहेर पडत आहेत. घरात करमत नाही म्हणून पेट्रोल भरायला जाणे, मित्राकडे जाणे, कंटाळा आला म्हणून बाहेर पडलो असे सांगणे, दूध आणायला चाललो आहे अशी थाप मारणे, अशी एक ना अनेक कारणे नागरिक देत आहेत. विशेष म्हणजे कित्येक वाहने, नागरिक डाॅक्टरांकडे जायचे आहे म्हणून बाहेर पडत आहेत. अशा पध्दतीने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक बाहेर पडून स्वतःच्या व इतरांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. काही करून घराबाहेर पडणे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करताना नागरिक दिसत आहे. एकट्याने गेल्यावर पोलिस मारहाण करतात, म्हणून बहुतांश जण कधी नव्हे ते आपल्या पत्नीला सोबत घेऊन घरातून बाहेर निघत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.

पोलिसांनी नियमांकडे बोट दाखवल्यानंतर अनेकजण खोडसाळपणा करून ते कसे मोडता येईल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी कित्येकदा समज दिल्यानंतर देखील नागरिक त्याच चुका पुन्हा-पुन्हा करताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून कुणाला शिक्षा केल्यास त्यावरून देखील पोलिस बांधवांना ट्रोल केले जात आहे. बंदोबस्तासाठी तैनात असलेले काही पोलिस बांधव सर्व सामान्यासाठी आपल्या कुटुंबापासून दूर रहात आहेत. अवेळी कधी-कधी विना चहा, नाष्टा, जेवण वेळ येईल तशी सेवा देताना मानसिक दुष्ट्या तणावात सेवा देत आहे. यापेक्षाही त्यांना बाहेर फिरणाऱ्या नागरिकांकडून मिळणारे असहकार्य त्यांना व्यथीत करताना दिसत आहे.

सध्या आपले घरच आपले हाॅस्पिटल!
गाडीवर विशिष्ट स्टिकर चिटकवला म्हणजे पोलिस पाहत नाहीत, ते सोडून देतात. असा काही नागरिकांचा समज झाला आहे. पोलिसांना संशय आल्यास बारकाईने सगळ्या वाहन चालकांची तपासणी केली असता, त्यातील अनेकांनी खोटी कारणे सांगून घराबाहेर पडल्याचे दिसून आल्यास सक्त कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे घराबाहेर न पडणेच योग्य आहे. बाहेर कोरोना व्हायरस आपली वाट पहात असून सध्या आपले घरच उत्तम हॉस्पीटल आहे. हे प्रत्येकांने समजायला हवे.

नागरिकांनी घरातच थांबने फायद्याचे
नागरिक अतिरेक करताना दिसून येत आहेत. ते पोलिसांचा गैरफायदा घेत आहेत. ज्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेचा स्टिकर आहे, अशे काही व्यक्ती जिल्हाजोड रस्त्यावर आपल्या नातेवाईकांची व इतर वाहतूक करताना आढळले आहे. नागरिकांनी घरातच थांबने फायद्याचे आहे. त्यांनी स्वत:च स्वत:ची काळजी घ्यायला हवी. नागरिक फार निष्काळजीपणे वागताना दिसत आहेत. नागरिकांनी आपापल्या घरातच थांबावे व पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून केले जात आहे.