esakal | टोळधाड रोखायची आहे? हे करा उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

locust

टोळधाडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी हा योग्य पर्याय आहे. फवारणी शक्‍यतोवर रात्री उशिरा किंवा पहाटेच्यावेळी करावी. यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झालेले असतात व त्यावेळी फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात टोळधाडीवर नियंत्रण मिळविणे शक्‍य आहे,

टोळधाड रोखायची आहे? हे करा उपाय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : टोळधाडीच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. टोळधाडीमध्ये हातातोंडाशी आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान होते. वादळी पाऊस, जंगली श्‍वापदांचा त्रास, नापिकी अशा अनेक संकटांबरोबर आता टोळधाडीचे संकट शेतकऱ्यांसमोर आवासून उभे आहे. शेतकऱ्यांना या टोळधाडीपासून थोडासा दिलासा देण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
टोळधाडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी हा योग्य पर्याय आहे. फवारणी शक्‍यतोवर रात्री उशिरा किंवा पहाटेच्यावेळी करावी. यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झालेले असतात व त्यावेळी फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात टोळधाडीवर नियंत्रण मिळविणे शक्‍य आहे, असे कृषी विभागाने पत्रकात म्हटले आहे.
जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी तालुक्‍यात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही कीड तिच्या मार्गातील सर्वप्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करते. या कीटकांच्या थव्याची व्याप्ती 10 किलोमीटर लांब व 2 किलोमीटर रुंद इतक्‍या मोठ्या प्रमाणावर आहे. या किडीचे थवे ताशी 12 ते 16 किलोमीटर इतक्‍या वेगाने उडतात. ही टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडत जातात, जातांना दिसेल त्या हिरव्या पानांचा फडशा पाडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कृषी विभागाच्या सुचनेनुसार शेतकऱ्यांनी शेतात धूर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे व शेवटी फवारणी करणे सुरू केलेले आहे. किडीच्या सामूहिक नियंत्रणासाठी ट्रॅक्‍टर ऑपरेटेड स्प्रेयर व अग्निशमन दलाच्या बंबांनी क्‍लोरोपायरीफॉस 80 लीटर कीटकनाशकाची फवारणी मोहाडी व तुमसर तालुक्‍यातील काही भागात केली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे क्षेत्रीय भेटी देण्यात येत असून शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही एक महत्त्वाची कीड असून जेव्हा ही कीड समूहाने आढळून येते तेव्हा ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. वाळवंटी टोळ आपली अंडी ओल्या वाळूमध्ये 10 ते 15 सेंमी आत समूहाने घालतात. एक मादी साधारणत: 150 ते 200 अंडी घालते. अंडी सर्वसाधारणपणे 10 ते 12 दिवसात उबवतात. पिल्ले 22 दिवसांत पूर्ण होतात. शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेताच्या आजूबाजूला मोठे चर खोदावे तसेच मोठ्याने वाद्ये वाजवावीत, संध्याकाळी रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर टोळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास टोळधाडीवर नियंत्रण मिळविता येते. फवारणी शक्‍यतोवर रात्री उशिरा किंवा पहाटेच्यावेळी करावी. यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झालेले असतात. त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवणे शक्‍य होते, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी केले आहे.

सविस्तर वाचा - सावधान! स्वच्छतागृह ठरत आहेत धोकादायक

प्रतिबंधात्मक उपाय
निंबोळी आधारित कीटकनाशक आझाडिरेक्‍टिन 1500 पीपीएम 30 मिली. किंवा 5 टक्‍के निंबोळी अर्काची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 20 किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये फिप्रोनिल 5 एससी 3 मिलि मिसळावे व त्याचे ढीग शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व या आमिषामुळे ही कीड मरण पावते. मिथिल पॅराथिऑन 2 टक्‍के भुकटी 25 ते 30 किलो प्रतिहेक्‍टर धुरळणी करावी. टोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास कीटकनाशक क्‍लोरोपायरीफॉस 20 ईसी 24 मिली. किंवा क्‍लोरोपायरीफॉस 50 ईसी मिलि किंवा डेल्टामेथिन 2.8 ईसी 10 मिलि किंवा फिप्रोनिल 5 एससी 2.5 मिलि किंवा ल्यांबडासायहेलोथ्रिन 5 ईसी 10 मिलि किंवा मॅलाथिऑन 50 ईसी 37 मिलि प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.