कसे रोखणार ही वनस्पती खाण्यापासून जनावरांना? पशुपालकांसमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

वडगाव राजदी व बाजदी येथील ढोरकाकडा वनस्पती खाल्ल्याने जनावरे दगावल्याची माहिती समोर आली आहे; तर मंगरूळ दस्तगीर येथील दोन जनावरे मृत्यूशय्येवर आहेत. त्यामुळे ढोरकाकडा ही वनस्पती जनावरांना खाण्यापासून रोखण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : अमरावती जिल्ह्यातील धामणगावरेल्वे तालुक्‍यातील वडगाव राजदी येथील जनावरे दगावणे सुरूच आहे. ढोरकाकडा ही वनस्पती खाल्ल्याने रविवारला (ता. 23) या गावातील 5 जनावरे मृत्युमुखी पडली. आता मृत जनवरांची संख्या 46 झाली आहे. नागपूर जिल्ह्यातही ही वनस्पती खाल्ल्याने जनावरे दगावली होती.

 

दरम्यान वडगाव राजदी येथील 21 जनावरांवर उपचार सुरू होते. रविवारी त्यातील 5 जनावरे दगावली असून, उर्वरित 16 जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र पशुसंवर्धन विभाग जनावरांचा जीव वाचविण्यात असमर्थ ठरत असल्याचे बोलले जात आहे.

 

ढोरकाकडा ही वनस्पती ही जनावरांच्या जिवावर बेतणारी आहे. कपाशीच्या पिकात ढोरकाकडा ही तण वनस्पती असते. ती खाल्ल्याने जनावरांची लघवी बंद होते. परिणामी जनावरांचा जीव जातो. ही वनस्पती खाल्ल्याने वडगाव राजदी, वडगाव बाजदी व मंगरूळ दस्तगीर परिसरात मागील दोन दिवसांत 46 जनावरे दगावली आहेत. दरम्यान पशुसंवर्धन विभागातर्फे ढोरकाकडा वनस्पती खाल्लेल्या 16 जनावरांवर उपचार करण्यात आले.

शेतकऱ्यांना दिल्या सूचना

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, सहायक आयुक्त डॉ. साधना घुगे, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वज्ञ चिकित्सालयाचे डॉ. राजेंद्र पेठे यांनी वडगाव येथे भेटी देऊन जनावरांची तपासणी केली व शेतकऱ्यांना सूचना दिल्या.

ग्रामपंचायतमार्फत जनजागृती सुरू

ढोरकाकडा वनस्पती जनावरांना खाऊ देऊ नये, आवश्‍यक उपाययोजना यासंदर्भात ग्रामपंचायतमार्फत जनजागृती करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. तसेच गावात दवंडी देण्यात आलेली आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी सांगितले.

असे का घडले? : आता विद्यार्थ्यांना होणार नाही विषबाधा!, शिक्षणाधिकाऱ्यांनी केली ही सूचना...

काटपूर येथे 15 जानवरांना विषबाधा

काटपूर : मोर्शी तालुक्‍यातील काटपूर (ममदापूर) येथील जनावरांनी ढोरकाकडा ही विषारी वनस्पती खाल्ल्याने 15 जनावरांना विषबाधा झाली. जनावरांमध्ये विषबाधेचे लक्षण दिसताच पशुपालकांनी ही बाब जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड यांच्या निदर्शनास आणून दिली.

शरद मोहोड यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी मुकुुंद उमरसकर यांना घटनास्थळी पाचारण करून विषबाधित जनावरांवर तातडीने उपचार केले. त्यामुळे काही विषबाधित जनावरांचे प्राण वाचविणे शक्‍य झाले. काटपूर येथील विषबाधित जनावरांवर उपचार करताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमरसकर तसेच शेतकरी ज्ञानेश्‍वर पकडे, भूजंग यावले, सतीश माहुलकर, पंकज म्हाला, गोविंदा बहादूरकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to prevent animals from eating this plant?