सांगा बरं, इथे कसे घडतील खेळाडू ?

विजय वानखेडे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

मागील 30 वर्षांपासून खेळाडूंना खेळण्यासाठी व सरावासाठी एकही सुव्यवस्थित क्रीडामैदान उपलब्ध नाही. नगर परिषद स्थापनेनंतर या बाबींकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी खेळाडू व नागरिकांची अपेक्षा होती. परंतु सुविधा नसल्याने खेळाडूंना नाइलाजाने सरावासाठी नागपूरला जावे लागते.

वाडी (जि.नागपूर) ः नगर परिषद झाल्यावर उत्तम बगीचे, क्रीडामैदान, रस्ते, दवाखाना इत्यादी दर्जेदार सुविधा निर्माण होतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र लवकरच त्यांचा अपेक्षाभंग झाला. गजानन सोसायटीमध्ये असलेल्या एकमेव क्रीडा मैदानाची दुरवस्था व दुर्लक्ष यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र नाराजी दिसून आली.

क्रीडाविषयक सुविधांकडे दुर्लक्ष
मागील 5 वर्षांपासून नगर परिषदेमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या भाजपची सत्ता आहे. आमदार समीर मेघे यांचे यावर अप्रत्यक्ष नियंत्रण आहे. एक लाख लोकसंख्येच्या वसाहतीत मोठ्या प्रमाणात युवक व विद्यार्थी आहेत. परंतु मागील 30 वर्षांपासून खेळाडूंना खेळण्यासाठी व सरावासाठी एकही सुव्यवस्थित क्रीडामैदान उपलब्ध नाही. नगर परिषद स्थापनेनंतर या बाबींकडे विशेष लक्ष दिले जाईल, अशी खेळाडू व नागरिकांची अपेक्षा होती. परंतु सुविधा नसल्याने खेळाडूंना नाइलाजाने सरावासाठी नागपूरला जावे लागते.

ग्रामपंचायतच्या शेवटच्या टप्प्यात गुरुप्रसादनगर येथील महिलांनी व जागरूक नागरिकांनी एकत्रित येऊन या मैदानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी संघर्ष व आंदोलने केलीत. परिणामतः वर्तमान नगराध्यक्ष प्रेम झाडे हे जि.प.सदस्य असताना दखल घेऊन एनआयटीने 40 लाख रुपये खर्च करून या मोठ्या मैदानावर कुंपण घातले. त्यामुळे काही प्रमाणात सुरक्षा झाली. न. प. स्थापनेनंतर या ठिकाणी ग्रीनजिम व मुलांसाठी खेळणी लावलीत. मात्र आता या सर्वांची गंभीर अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी कुंपणजाळ्या तुटल्या, खेळणे तुटले, ग्रीन जिम साहित्य तुटले. बसण्याच्या खुर्च्या तुटल्या, मातीचे ढीग जमले आहेत, मुत्रीघर निकामी आहे. मैदानात मोठा हायमास्ट लाइट बसविला, तोही बंद असल्याने एका भागात अंधार आहे.

एकमात्र क्रीडा मैदानाची दुर्दशा
याकडे न.प.नेते, नगरसेवकांचे पूर्ण दुर्लक्ष दिसते. प्रवेशद्वारावर कुलूप व सुरक्षारक्षक नसल्याने रात्री मोकाट जनावरे येऊन मैदानात बैठक जमवितात. काही नागरिक आपल्या कुत्र्यांना शौच करण्यास येथे आणतात. आत कसलीही आडकाठी नसल्याने ट्यूशनचे व महाविद्यालयीन विद्यार्थी दिवस व रात्रीदेखील अश्‍लील चाळे करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मुख्य प्रवेशद्वार उघडेच असल्याने यासह नियम व वेळापत्रक नसल्याने कुणीही येऊन या ठिकाणी येऊन अश्‍लीलतेचे प्रदर्शन करतात.

धोरणांचा अभाव
न.प.ने मागील पाच वर्षांत कोणतेही क्रीडाधोरण ठरविले नसल्याने उत्तम क्रीडापटू निर्माण होण्यासाठी वातावरण निर्माण होऊ शकले नाही.
प्रेम झाडे यांनी मागील 2 वर्षांत कबड्डी स्पर्धा संपन्न केलेला प्रयत्न पुढे न.प व लोकप्रतिनिधी यशस्वी करू शकले नाही. लवकरच लक्ष दिले नाही तर स्थिती गंभीर होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

इच्छाशक्‍तीची आवश्‍यकता
नियमित देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष, सुरक्षेअभावी मैदानाची स्थिती चिंताजनक आहे. नागरिक या बाबीकडे कामचलाऊ दृष्टीने बघतात. परिणामतः उदयोन्मुख खेळाडू निर्माण होण्यासाठी वाडीत वातावरण व सुविधा नाहीत. ठोस नियोजन, नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची आवश्‍यकता आहे.
प्रा. सुभाष खाकसे
स्थानिक निवासी

कोणीही या, काहीही करा !
मैदानाची कोणतीही सफाई नाही. वृक्षारोपण नाही. ट्यूशनचे विद्यार्थी कंपाउंडवरून उड्या मारून जातात. कोणीही या, काहीही करा. नगर परिषदेचे पूर्णत: याकडे दुर्लक्ष आहे.
निर्मला निघोट
स्थानीय निवासी

निधी न मिळाल्याने काम ठप्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीड वर्षाआधी मैदानाचे सुशोभीकरण व खेळाच्या ट्रॅक बनविण्यासाठी निधीची मागणी केली व वेळोवेळी आवश्‍यक कागदपत्रांचा पाठपुरावाही केला. परंतु अजूनपर्यंत निधी प्राप्त न झाल्याने हे कार्य थांबले आहे.
नीता कुणावर
नगरसेविका, वॉर्ड क्रमांक 9


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How will the players in the bowl happen?