esakal | मरणापेक्षा मासे महत्त्वाचे; गडचिरोलीतील मासळी बाजारात खरेदीसाठी तुफान गर्दी
sakal

बोलून बातमी शोधा

मरणापेक्षा मासे महत्त्वाचे; गडचिरोलीतील मासळी बाजारात खरेदीसाठी तुफान गर्दी

मरणापेक्षा मासे महत्त्वाचे; गडचिरोलीतील मासळी बाजारात खरेदीसाठी तुफान गर्दी

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : माणूस जगण्यासाठी खातो, असे म्हणतात. पण, हेच खाणे जिवावर बेतले, तर? सध्या अशी परिस्थिती गडचिरोली शहरात बघायला मिळत आहे. येथे नागरिकांना मरणापेक्षा मासे खाणे महत्त्वाचे वाटत आहे. ही बाब शहरातील मासळी बाजारातील तुफान गर्दीवरून अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा: लॉकडाउनमुळे सूतगिरण्या पडल्या बंद; कामगारांचे प्रचंड हाल; उपासमारीची वेळ

जागतिक महामारी असलेल्या कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मृतांची आणि बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत. केवळ जीवनावश्‍यक दुकाने तेही सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. मात्र, चवीसाठी खाणाऱ्यांना कोरोनाची कोणतीच पर्वा नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर चिकन, मटण आणि मासळी बाजार आहे. त्यातही मासळी बाजार अतिशय तोकड्या जागेत आहे.

या जागेला चहुबांजुनी भिंती असून प्लॅस्टिकचे छावणीवजा दुकाने तयार करून त्यात मासळी विक्री होते. एकूणच जागा कमी असल्याने काही ग्राहक असले, तरी येथे मोठी गर्दी दिसते. असे असताना येथे मासळी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. रविवार, बुधवार, शुक्रवार हे दिवस मांसाहारी नागरिकांसाठी विशेष आवडीचे असतात. या दिवशी मासे, मटण, चिकन, अंडे आदी सामिष आहार घेतला जातो. बुधवार शहरातील मासळी बाजार भरला होता. येथे मासळी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. अनेक नागरिक मास्कसुद्धा घालून नव्हते.

शारीरिक अंतराच्या नियमाचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे दिसून आले. येथे कोरोना प्रतिबंधासाठी सांगितलेले कोणतेच नियम पाळल्याचे दिसून आले नाही. नागरिक अगदी दाटीवाटीने मासे खरेदी करत होते. विशेष म्हणजे मासे खरेदी करताना चिकन, मटण प्रमाणे मागणी केल्या बरोबर मिळत नाही. आधी विक्रेते मासे समोर ठेवतात. हे मासे तीन किलोपासून अगदी 15 किलोपर्यंतही असतात. मग, नागरिक त्यांना हवा असलेला अर्धा किलो, पाऊण किलो, एक किलो, दोन किलो वगैरे वाटा सांगतात. मासळी जेवढ्या किलोची असेल तेव्हढे ग्राहक पूर्ण झाले की, मासोळी कापली जाते.

त्यानंतर तिच्या तुकड्यांचे वाटे करून मागणीनुसार ग्राहकांना देण्यात येतात. या सर्व प्रक्रियेत बराच वेळ जातो. तेवढा वेळ ग्राहक दुकानाभोवतीच ताटकळत असतात. बुधवारी असेच नागरिक अगदी दाटीवाटीने दुकानाभोवती उभे होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणून प्रशासनाने या गंभीर प्रकाराची गांभिर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक! चक्क डॉक्टरनेच लपवला रेमडेसिव्हिरचा साठा; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

नियोजन आवश्‍यक

मटण, मासे, चिकन हे जीवनावश्‍यक खाद्यपदार्थांमध्येच मोडत असल्याने ते नागरिकांसाठी आवश्‍यकच आहे. पण, एरवीही अशा बाजारांमध्ये गर्दी असतेच. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य नियोजन करायला हवे. सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष केवळ भाजीविक्रेत्यांकडेच आहे. मात्र, जिथे चिकन, मटण, मासेविक्री होते तिथे पोलिस कर्मचारी, सुरक्षारक्षक किंवा गृहरक्षक ठेवणे, शारीरिक अंतरासाठी खुणा करून ठेवणे, मास्क, सॅनिटायझर आदींची पाहणी करणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, अद्याप यातील काहीही करण्यात आलेले नाही.

संपादन - अथर्व महांकाळ

loading image