esakal | लॉकडाउनमुळे सूतगिरण्या पडल्या बंद; कामगारांचे प्रचंड हाल; उपासमारीची वेळ

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनमुळे सूतगिरण्या पडल्या बंद; कामगारांचे प्रचंड हाल; उपासमारीची वेळ
लॉकडाउनमुळे सूतगिरण्या पडल्या बंद; कामगारांचे प्रचंड हाल; उपासमारीची वेळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एकेकाळी हजारो कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकऱ्यांच्या कापसाला उत्तम भाव देणाऱ्या सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्या आता लॉकडाउन झाल्याने हजारो कामगारांवर संकट कोसळले असून कापूस उत्पादक शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. अमरावती जिल्ह्यात केवळ धामणगावरेल्वे येथील श्री गजानन सहकारी सूतगिरणी तसेच जवाहर सूतगिरणी सोडली तर सर्वच बंद अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे गिरण्याच शिल्लक नसल्याने त्यांच्या कामगारांचे प्रश्‍न मांडणाऱ्या संघटनासुद्धा शांत झाल्या आहेत.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक! चक्क डॉक्टरनेच लपवला रेमडेसिव्हिरचा साठा; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

श्री गजानन सहकारी सूतगिरणीची स्थापना 9 जुलै 1992 रोजी झाली. याठिकाणी 232 कामगार कार्यरत आहेत. पहिल्या लॉकडाउनमध्ये काही दिवस सूतगिरणी बंद होती. आतासुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर गिरणी बंद होण्याची शक्‍यता आहे. चांदूररेल्वे तालुक्‍यातील जवाहर सहकारी सूतगिरणीची स्थापना 24 डिसेंबर 1991 रोजी झाली असून याठिकाणी 202 कामगार कार्यरत आहेत. कोरोनाचा परिणाम झाला नसल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

800 कामगारांचे संसार देशोधडीला

गेल्या दोन दशकांपासून बंद स्थितीत असलेल्या दर्यापूरच्या श्रीसंत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीला लागलेल्या ग्रहणामुळे 800 कामगारांचे संसार देशोधडीला लागले आहेत. हजारो शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. कामगारांनी आंदोलने केली, शेतकऱ्यांनी जागर केला, सूतगिरणी पुन्हा सुरू व्हावी यासाठी अनेकांनी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र अनेक वर्षांच्या प्रयत्नातून हाती काहीच आलेले नाही.

फिनले मिलमध्ये कच्च्या मालाचा प्रश्‍न

अचलपुरात 1926 साली राजाभाऊ देशमुख यांनी विदर्भ मिलची सुरुवात केली होती. त्यावेळी सुमारे 850 कामगार याठिकाणी कार्यरत होते. परंतु डिसेंबर 2005 मध्ये ही मिल बंद झाली. 2008 मध्ये येथे फिनले मिल सुरू झाली. मात्र, मागच्या वर्षीच्या लॉकडाउनपासून ही मिलसुद्धा अडचणींच्या मालिकेतून जात असून कामगारांचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. मध्यंतरी सुरू झालेली ही मिल कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने सध्या बंद पडली आहे. येथे 400 नियमित व 300 डेलिवेजेसवर कामगार कार्यरत होते. नियमित कामगारांना अर्धा पगार दिल्या जात आहे.

हेही वाचा: धामणगावात बुधवार ठरतोय कोरोनावार; नागरिकांची प्रचंड गर्दी; समूह संसर्गाचा धोका

विजय मिलला टाळे

बडनेरा येथे विजय मिल होती. बडनेरा तसेच अमरावती शहरातील हजारो कामगार याठिकाणी सेवा देत होते. परंतु ही मिल बंद पडून दोन दशकांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या मिलच्या जागेवर टेक्‍सटाईल पार्क सुरू करण्याच्या घोषणा झाल्या, परंतु पुढे त्याचे काहीही झाले नाही. त्यामुळे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह येथील कामगार करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ