esakal | धामणगावात बुधवार ठरतोय कोरोनावार; नागरिकांची प्रचंड गर्दी; समूह संसर्गाचा धोका

बोलून बातमी शोधा

धामणगावात बुधवार ठरतोय कोरोनावार; नागरिकांची प्रचंड गर्दी; समूह संसर्गाचा धोका
धामणगावात बुधवार ठरतोय कोरोनावार; नागरिकांची प्रचंड गर्दी; समूह संसर्गाचा धोका
sakal_logo
By
सायराबानो अहमद

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) ः एकीकडे कोरोनाचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे शासनाने कडक निर्बंध लावत संचारबंदी लागू केली असताना धामणगाव येथे बुधवारच्या आठवडी बाजारात चक्क गर्दीचा बाजार भरला होता.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक! चक्क डॉक्टरनेच लपवला रेमडेसिव्हिरचा साठा; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्ण आढळत असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र शहरात याला हरताळ फासल्या जात असल्याचे चित्र बुधवारी (ता.28) दिसून आले. भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने संसर्गाचा धोका वाढतच आहे.

कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी शासनाने पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई घातली आहे, तर सर्व अत्यावश्‍यक सेवेसह महत्त्वाच्या दुकानांना सकाळी 11 पर्यंतच वेळ दिली आहे. मात्र सर्व नियमांचे धामणगाव शहराच्या बाजार परिसरात उल्लंघन होतानाचे चित्र आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन हतबल झाल्याने आरोग्ययंत्रणेवर ताण आला आहे.

अनेक गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, मिळाला तर रेमेडेसिव्हिर इंजेक्‍शनसाठी धावाधाव करावी लागत आहे. असे असतानादेखील नागरिकांची मानसिकता बदलण्यास तयार नाहीत. खरेदीच्या नावाखाली गर्दी केली जात आहे. त्यामुळे शासनाने लागू केलेल्या लॉकडाउनचा काय फायदा? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हेही वाचा: "राहू द्या नं भाऊ.. वर्षभरापासून आम्ही अपमानच सहन करतोय"; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांना उपेक्षेची वागणूक

खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक सुरक्षित अंतर पाळत नाहीत. काहीजण मास्कचा वापर करीत नाहीत. त्यामुळे लॉकडाउन करूनही समूह संसर्गाचा धोका कायम आहे. भाजीपाला विक्रेत्यांना पालिका प्रशासनाने जागा आखून दिली असली तरी माल विक्री होण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू असल्यामुळे गर्दी होत आहे. यामुळे प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ