esakal | "राहू द्या नं भाऊ.. वर्षभरापासून आम्ही अपमानच सहन करतोय"; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांना उपेक्षेची वागणूक

बोलून बातमी शोधा

null
"राहू द्या नं भाऊ.. वर्षभरापासून आम्ही अपमानच सहन करतोय"; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांना उपेक्षेची वागणूक
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः राहू द्या नं भाऊ....आमची गत काय विचारता. वर्षभरापासून आम्ही अपमानाचं जीन सहन करत आहोत. कोरोनाच्या या संकटावर मात करण्यासाठी आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून झुंजत आहोत. कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून बाधा होऊ नये म्हणून आम्ही त्या व्यक्तीची कधी प्रत्यक्ष भेट घेतो, नाहीतर फोनवरून संवाद साधतो, परंतु आम्ही जे ऐकायला मिळते ते सांगू शकत नाही, आम्ही सारे उपेक्षेचे धनी ठरलो, परंतु पोटासाठी सहन करावे लागते, या व्यथा आहेत बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या. विशेष असे की, हे कर्मचारी नसून भावी पिढी घडवणारे शिक्षक आहेत. मात्र या कोरोनामुळे समाजात मानाचं स्थान असलेल्या शिक्षकांना अपमान गिळून मिळालेलं काम करावं लागत आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! एकाच आठवड्यात बाप-लेकानं गमावला जीव;आई अजूनही रुग्णालयात

ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणात बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. गावखेड्यात शिक्षकांचा मोठा सन्मान असतो, गुरुजी शिवाय कोणीही त्यांच्याशी बोलत नाही, परंतु कोरोनाच्या या संकटात गावखेड्यातील माणूस असो की, शहरातील व्यक्ती या साऱ्यांनी माणूसपण सोडल्यासारखे चित्र दिसत आहे.

सरोज नायडू (बदललेले नाव) ही महिला म्हणाली,मी शिक्षिका आहे, पंचवीस वर्षांपासून अध्यापनाचे काम करते, परंतु कोरोनाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला जुंपल्यानंतर अधिकारी वर्गाकडून दबाव असतो, तर दुसरीकडे ज्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काम करतो, त्यांच्याकडूनही आम्हाला शब्दांचा मार सहन करावा लागतो. आमच्याकडे बघणाऱ्या नजराही वाईटच असल्याचे दिसते. हिंगणा तालुक्यातील योगेश वर्गीस (बदललेले नाव) म्हणाले, वैयक्तिक समस्यांशी झुंजत आम्ही त्यांचा शोध घेतो. आपल्या परीने प्रयत्न करीत त्यांच्या घरी पोहचतो, संपर्क झाला नाहीतर पाच वेळा फोन करतो, मात्र आमच्या भावना ना अधिकार ऐकून घेत ना..ना ज्यांना कोरोनापासून धोका होण्याची भीती आहे ते गावकरी.

समुपदेशनाची गरज भासणार

कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता, प्रशासनाला बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे दिवसेंदिवस अवघड बनले आहे. असे असताना आता कोरोनाबाधितांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाचा भार हलका होत आहे. आपल्या संपर्कात कोण, कोण आले, त्यांना फोन करून, आपणही कोरोना चाचणी करून घ्यावी, असे समुपदेशन आम्ही करतो. परंतु त्यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीमुळे आमच्यावर मानसिक आघात होतो. आता आम्हालाच समुपदेशनाची गरज भासणार आहे, आता समाजात काम करणे अवघड झाले असल्याची भावना शिक्षकांनी बोलून दाखवली.

हेही वाचा: नागरिकांनो सावधान! तुमच्या खिशातील नोटा डुप्लिकेट तर नाहीत ना? शंभर, दोनशेंच्या नोटांमध्ये गडबड

डॉक्‍टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यासारखेच आम्ही देखील नागरिकांच्या सेवेसाठीच आहोत. परंतु आमच्या सेवेला मोल नाही. कोरोना योद्ध्यांप्रमाणेच आम्ही आपला जीव धोक्‍यात घालून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम करतो. ही समाज सेवाच आहे. आम्हाला धन्यवाद देण्याऐवजी माणुसकीला लाजवेल, असा व्यवहार आमच्याशी होतो.

-शेखर कान्हेकर, नागपूर.

संपादन - अथर्व महांकाळ