मानवी तस्करी : पुन्हा एका युवतीच्या विक्रीचा प्रयत्न फसला!

प्रमोद काकडे
गुरुवार, 9 जानेवारी 2020

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील एका अल्पवयीन मुलीला हरियानात विकल्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षांनंतर उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी चंद्रपुरातील जान्हवी मुजुमदार आणि सावित्री रॉय या दोन महिलांना व नंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून गीता मुजुमदार हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात गीताने पोलिसांना खळबळजनक माहिती दिली.

चंद्रपूर : मानवी तस्करी प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच अटकेतील एका महिला आरोपीकडून मिळालेल्या माहितीने आणखी एका प्रकरणाचे बिंग फुटले आणि पोलिसांनी सतर्कतेने लग्नाच्या नावावर युवतीचा सौदा करणाऱ्या सातजणांना गजाआड केले.

हे वाचाच - समीरने लावली अंकुशच्या गळ्यावर तलवार; मग घडला थरार

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील एका अल्पवयीन मुलीला हरियानात विकल्याचे प्रकरण तब्बल दहा वर्षांनंतर उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी चंद्रपुरातील जान्हवी मुजुमदार आणि सावित्री रॉय या दोन महिलांना व नंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून गीता मुजुमदार हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात गीताने पोलिसांना खळबळजनक माहिती दिली.

त्यांच्याच टोळीतील मानवी तस्करीचे काम करणाऱ्या जिजाबाई नामक महिलेने एक सौदा केला आहे. त्यानुसार चंद्रपुरातील क्रिष्णानगर परिसरातील एका कुटुंबातील मुलीचे लग्न मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये लावून दिले जाणार आहे. त्यासाठी सहा व्यक्ती गुरुवारला चंद्रपुरात येणार आहेत, असे गीताने पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिस सतर्क झाले. त्यांनी सापळा रचला.

या प्रकरणात मध्य प्रदेशातील सहा व्यक्ती आणि या युवतीचा सौदा करणाऱ्या एका महिलेला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चंद्रपुरातील क्रिष्णानगर परिसरातील एका अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुलगी आहे. आज गुरुवारलाच तिचा विवाह लावून दिला जाणार होता. मध्य प्रदेशातील सहाही जण लग्नाच्या तयारीत आले होते. मुलाच्या हाताला मेहंदीसुद्धा लागलेली होती. परंतु तत्पूर्वीच पोलिसांच्या सापळ्यात ते अडकले.लग्नाच्या नावावर मुलगी विकण्याचा प्रकार आहे, असा दावा पोलिसांचा आहे. मुलीच्या कुटुंबीयांचे आणि ताब्यात घेतलेल्या सात जणांचे बयाण नोंदविणे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या मुलीला आई नाही. ती आपल्या बहिणीकडे राहते. या प्रकारामुळे मुलगी अत्यंत घाबरलेली आहे. मला मुलगा पसंत नाही, एवढीच प्रतिक्रिया या मुलीने "सकाळ'शी बोलताना दिली.

पोलिस कोठडीत वाढ

बुधवारी अटक झालेल्या गीता मुजूमदार हिला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सावित्री रॉय हिच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली. मात्र न्यायालयाने तिच्या पोलिस कोठडीत तब्बल सात दिवसांची वाढ केली. जान्हवी मुजूमदार हिची पोलिस कोठडी उद्या संपणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थापन केलेले विशेष तपास पथक हरियानात येत्या चोवीस तासांत रवाना होण्याची शक्‍यता आहे. तिथे दहा ते पंधरा आरोपी या प्रकरणातील आहेत.

 

मदतीत शासकीय अडचण!

दहा वर्षांपूर्वी प्रसादातून गुंगीचे औषध देऊन थेट हरियानात विक्री केलेल्या पीडितेला पोलिसांनी चंद्रपूरला आणले. तिला वडील नाहीत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वृद्ध आई दुसऱ्यांकडे भांडीधुणी करते. या पीडितेला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. मात्र, तिचे अपहरण होण्याला दहा वर्षे झाली असल्याने ती येथील रहिवासी असल्याचे सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे तिच्याकडे नाहीत. त्यामुळे मदत मिळवून देताना अडचणी निर्माण होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Human Trafficking: An Attempt to Sell a Girl Again!