या जिल्ह्यातील शेकडो नक्षलग्रस्त दुर्गम गावांत विजेचा लपंडाव सुरूच

पेरमिली : शोभेची वास्तू ठरलेले येथील वीजखांब.
पेरमिली : शोभेची वास्तू ठरलेले येथील वीजखांब.

गडचिरोली : नक्षल घटनांमुळे भारनियमनातून मुक्ती मिळालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मात्र नागरिकांना सध्या पावसाळ्याच्या दिवसात विजेच्या लपंडावाची समस्या भेडसावत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याचा जवळपास चारशेच्यावर गावांना फटका बसला आहे. तरीही वीज वितरण कंपनी मूग गिळून बसली आहे.

76 टक्के जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना नेहमीच वादळीवारा तसेच मुसळधार पावसाने वीज समस्येला तोंड द्यावे लागते. गेल्या महिन्यात वादळीपावसामुळे अनेक गावांत आठवडाभर वीजपुरवठा खंडित होता. लॉकडाउनच्या काळात तीव्र उन्हाच्या प्रसंगी वीज वितरणकडून बऱ्यापैकी खबरदारी घेतल्याने वीजपुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र, आता पावसाळा सुरू होताच दुर्गम गावांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

बॅंकांच्या व्यवहारावर परिणाम

एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा, कोरची, धानोरा व मुलचेरा या तालुक्‍यांतील नक्षलग्रस्त गावांत गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय विजेअभावी मोबाईल, इंटरनेटसेवा तसेच बॅंकांच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांनी मोर्चा काढून व्यक्त केला संताप

एटापल्ली तालुक्‍यातील मरपल्ली गावातील तसेच परिसरातील अनेक गावांत वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त नागरिकांनी एटापल्ली येथील वीज वितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. हीच समस्या सध्या नक्षलग्रस्त भागातील 450 च्या वर गावांना भेडसावत आहे. पावसाळा सुरू झाला असला; तरी वादळवाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली नसतानाही विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरातही वीज गूल
एटापल्ली तालुक्‍यातील अनेक गावांत गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा नियमित होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ही समस्या ग्रामीण भागातच नाही; तर शहरातही बऱ्याचदा जाणवत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- प्रज्वल नागूलवार, नागरिक, एटापल्ली.

वीजतारेवर पडतात झाडाच्या फांद्या
गडचिरोली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा जंगलव्याप्त आहे. त्यातच विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडत असल्याने वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. दुर्गम भागात वीजतारेवर झाडाच्या फांद्या पडतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी अडथळे येतात. परंतु, अशाही परिस्थितीही ग्राहकांना नियमित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, गडचिरोली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com