लॉकडाउनने बेजार केलेल्या सायकलरिक्षाचालकांचा वाली कोण?...कुटुंबीयांवरही आली उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. लोकल रेल्वेगाड्या, बसगाड्या बंद असल्याने सायकलरिक्षाचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांनाही उपासमारीच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

तुमसर (जि. भंडारा) : शहरातील 50 सायकलरिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबीयांवर लॉकडाउनमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. रोजगार हिरावून गेल्याने त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाकडून मदत मिळण्याची आशा सायकलरिक्षाचालकांना आहे.

दिवसाला व्हायची 400 रुपये कमाई

तुमसर शहरात जवळपास 50 तीनचाकी रिक्षाचालक असून मागील अनेक वर्षांपासून तुमसर रोड (देव्हाडी रेल्वेस्टेशन) येथून तुमसर शहरापर्यंत रिक्षा चालवीत होते. यातून रिक्षाचालकांना दररोज 400 ते 500 रुपये मिळत होते. परंतु, आता ऑटोरिक्षा आल्याने रिक्षाचालकांना तुमसर शहरातीलच सवारीवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडला आहे.

आता दररोजची 50 रुपयेच कमाई

ऑटोरिक्षा आल्यामुळे सायकलरिक्षांना प्रवाशांकडून विचारले जात नव्हते. यामुळे या रिक्षाचा वापर नुसते सामान वाहून नेण्यासाठी होत आहे. परंतु, काही दिवसांपासून कोरोनाच्या लॉकडाउनमुळे सायकलरिक्षाचालकांना सामान वाहून नेण्याचे कामही मिळणे दुरापास्त झाले आहे. आता तर लॉकडाउनमुळे सायकलरिक्षाचालक दररोज फक्त 50 रुपयेच कमवीत आहे; तर काही रिक्षाचालकाला मागील 10 ते 15 दिवसांपासून कोणतेही काम मिळाले नाही. यामुळे संध्याकाळची चूल कशी पेटेल, असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.

असं घडलंच कसं? : कोरोनाने लावला पानविक्रेत्यांना चुना; अडीच महिन्यांपासून दुकाने बंद

शासनाने करावी मदत

शहरातील सायकलरिक्षाचालकांचे नाव अद्यापही असंघटित कामगारांमध्ये नोंदणी झालेले नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनेनुसार कोणताही लाभ मिळत नाही. असंघटित कामगार म्हणून जर यांची नोंदणी असती; तर त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळाला असता. लॉकडाउनमुळे अनेक रिक्षाचालकांच्या परिवारातील सदस्य भांडीधुणीसाठी जात आहेत. शासनाने या रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मदत करावी, अशी मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunger crisis on cycle rickshaw drivers' families due to lockdown