शेतकऱ्यांवर संकट; मजुरांची उपासमार; परतीच्या पावसाने शेतात कोणते काम करावे हेच कळेना 

मोहन मातकर 
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

थडीपावनी, (जि. नागपूर) : हवामान बदल व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह मजुरांनाही त्याचा फटका बसला आहे. सोयाबीन येत असतानाच गेले तर कपाशीला बोंड धरल्यावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले आहे. उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. तर शेतात कामे नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

थडीपावनी, (जि. नागपूर) : हवामान बदल व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह मजुरांनाही त्याचा फटका बसला आहे. सोयाबीन येत असतानाच गेले तर कपाशीला बोंड धरल्यावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले आहे. उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. तर शेतात कामे नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 
नरखेड तालुक्‍यात मागील वर्ष नापिकीचे गेले. यंदा अतिपावसाने कहर केला आहे. कपाशीचे उत्पादन चांगले येणार अशी आशा असतानाच परतीचा पाऊस अनेक संकटे घेऊन आला आहे. कपाशीला प्रती झाड पंधरा ते वीसच्या वर बोंडे धरलेली नाहीत. त्यातही ऊन तापत नसल्याने बोंडे सडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कापूस नाही तर तो वेचण्याचा प्रश्‍नच येत नाही. तालुक्‍यातील थडीपवनी भागत मिरची पिकाचेही तेच हाल आहेत. महिनाभरात एकदाच तोडाई करावी लागत आहे. मका पीक सडू लागले आहे. तूर कळीवर असून फुलोऱ्याचे प्रमाण नसल्यात जमा आहे. 
एकंदरीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह मजुरांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे. मजुरांची रोजी 150 तर बाईची मजुरी 100 वर आहे. मागील वर्षी हाच दर 150 ते 200 रुपये प्रमाणे होता. यावर्षी दर कमी असतानाही कामे मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक मजूर घरीच बसून आहेत, ज्या मजुरांकडे थोडीफार शेती आहे तेदेखील निराशच आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका ज्यांच्याकडे शेती नाही अशा मजूर वर्गालाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह मजुरांचाही विचार करणे जरुरीचे आहे, असे मत माजी पंचायत समिती सदस्य संध्या मातकर, विजय गांधी, किशोर पुंड, दीपक गायनेर, अनिल पोद्दार यांनी व्यक्त केले. 

सावकारी कर्जाचे प्रमाण वाढले 
यावर्षी ग्रामीण भागात नवीन कपड्यांविना दिवाळी करावी लागली. त्यातही भर म्हणून ग्रामीण भागातील खासगी गटाचे लोन घेणे-देणे जास्त प्रमाणात आहे. दर आठवड्याला या खासगी गटाचे व्याज परतावा करावाच लागतो. त्यामुळे भुरट्या चोरांचे प्रमाण वाढ झालेली दिसून येते. कामे काढून घेण्यासाठी व्याजाचा दर न ठरविता खासगी सावकाराकडून रक्कम उचल होत आहे. याचा फटका आगामी काळात बसू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunger strike on laborers due to no field work