वन्यप्राण्याची शिकार करणे भोवले, तिघांना वनकोठडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कापसी गावाजवळील जंगलात करंट लावून वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने तिघांना ताब्यात घेतले. अजय भोजराज मेश्राम, सुरेश विठ्ठल गेडाम, रमेश श्रीरंग भोयर, अशी आरोपींची नावे आहेत.

सावली (जि. चंद्रपूर) : सावली परिक्षेत्राअंतर्गत असलेल्या कापसी गावाजवळील वनविभागाच्या कक्ष क्रमांक 201 मधील 11 केव्ही विद्युत तारेद्वारे करंट लावून वन्यप्राण्याची शिकार करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर वनविभागातील चमूला मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले.

चौकशीदरम्यान वन्यप्राण्यांचे हाड जप्त करण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या चमूने तपास सुरू केला आहे. तपासात अजय भोजराज मेश्राम, सुरेश विठ्ठल गेडाम, रमेश श्रीरंग भोयर यांना ताब्यात घेण्यात आला.

शिकार झालेला वन्यप्राणी कोणता

शिकार करण्यात आलेला वन्यप्राणी कोणता आहे, याचा तपास वनविभाग करीत आहे. तिन्ही आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्हा नोंदविला आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

आरोपींना एक फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी

एक फेब्रुवारीपर्यंत त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. तपास विभागीय वनाधिकारी ए. एल. सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस. एल. लखमावाड, वनपरिक्षेत्राधिकारी जी. व्ही. धाडे करीत आहेत.

असे का घडले? : नवनीत राणांचा संताप अनावर होतो तेव्हा...

वाघाचा पंजा, नख जप्त

या प्रकरणाच्या तपासासाठी वनविभागाची चमू सावली येथे दाखल झाली आहे. त्यांनी आरोपींची कसून चौकशी केली. चौकशीत वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्‍यातील हळदगाव येथील एकाचे नाव त्यांनी उघड केले. वनविभागाच्या चमूने हळदगाव गाठून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाघाचा पंजा, नख जप्त करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunting for wildlife, three to arrest at chandrapur