बाळाच्या घाईने पती-पत्नी भरपावसात घराकडे निघाले; अन् नियतीने डाव साधला 

राहुल मैंद
Saturday, 19 September 2020

पती पिंटू आणि पत्नी गुंजन हे पारडगावाचे रहिवासी आहेत. दो वर्षांपूर्वी पिंटू आणि गुंजनचा विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पिंटू भिवंडीला (मुंबई) नोकरीला होता. त्याची पत्नी गुंजन सासरी लहान मुलगा आणि सासूसोबत राहत होती. टाळेबंदी उठल्यानंतर पिंटू काही दिवसांसाठी गावाला आला होता.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : ब्रह्मपुरीवरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडगाव येथे दुचाकी वाहनाने जात असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमाराला घडली. पिंटू मोतीराम राऊत (वय ३२) आणि पत्नी गुंजन राऊत (वय २७) असे मृतकांची नावे आहेत.

पती पिंटू आणि पत्नी गुंजन हे पारडगावाचे रहिवासी आहेत. दो वर्षांपूर्वी पिंटू आणि गुंजनचा विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पिंटू भिवंडीला (मुंबई) नोकरीला होता. त्याची पत्नी गुंजन सासरी लहान मुलगा आणि सासूसोबत राहत होती.

टाळेबंदी उठल्यानंतर पिंटू काही दिवसांसाठी गावाला आला होता. दोन दिवसांनी त्याला पुन्हा भिवंडीला जायचे होते. शुक्रवारी पती-पत्नी ब्रह्मपुरी येथे काही कामानिमित्त दुचाकी वाहनाने आले होते. काम आटोपून घराकडे निघणार तोच मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. 

अवश्य वाचा - अल्पशिक्षित मुलीची नोकरीसाठी धडपड सुरू असताना ढकलले वेश्याव्यवसायात
 

पाऊस कमी होण्याची वाट पाहतो तर घरी लहान मुलगा एकटाच होता. आपले बाळ आपली वाट पाहत रडत असेल या विचाराने दोघांनीही भर पावसातच गावाला जायचा निर्णय घेतला. त्या बिचाऱ्या जिवांना काय माहीत की रस्त्यात आपल्यासाठी नियती एक वेगळाच खेळ खेळणार आहे म्हणून.

अवश्य वाचा - आला जावयाच्या कौतुकाचा महिना! बाजारात गर्दी, मिठान्न आणि भेटवस्तूंची रेलचेल
 

अंगावर पावसाच्या धारा झेलत बाळाच्या ओढीने दोघेही पती-पत्नी दुचाकीवरून आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले. गावाकडे परत जात असताना उदापूरजवळील अंजली राइस मिलनजीक अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. दोघांच्याही अचानक मृत्यूने पारडगावात शोककळा पसरली आहे.
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and Wife died due to lightning near Bramhapuri