
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्यावर त्याने रात्रभर मृतदेह घरातच लपवून ठेवल्याची खळबळजनक घटना उजेडात आली.
अमरावती : त्यांचा सुखाचा संसार होता. घरात दोन लहान मुले होती. मात्र एक दिवस संशयाचे भूत त्यांच्या संसारात शिरले आणि होत्याचे नव्हते झाले.
या संशयाने त्याने पत्नीची हत्या तर केलीच, सोबतच त्या लहान मुलांची आईही त्यांच्यापासून हिरावली गेली.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्यावर त्याने रात्रभर मृतदेह घरातच लपवून ठेवल्याची खळबळजनक घटना उजेडात आली.
नांदगावखंडेश्वर तालुक्यातील सावनेर गावात ही घटना घडली. संगीता देवानंद कुराडे (वय २९) असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक उदय सोयस्कर यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी देवानंद गणेशराव बुराडे (वय ३५) विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. देवानंद हा गावाजवळच्या एका पोल्ट्री फार्मवर मजूरी करतो. गावातच त्याचे घर आहे. नऊ व सहा वर्षे वयाची दोन मुले व पत्नी असे कुटूंब सोबत राहत होते. काही दिवसांपासून त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. त्यातून दाम्पत्यामध्ये भांडणे सुरू झाली. सोमवारी (ता. ११) रात्री अकराच्या सुमारास या दाम्पत्यात वाद झाला. देवानंदने रागाच्या भरात घरातच पत्नीचा गळा आवळून खून केला.
सविस्तर वाचा - नागपुरात तीन गर्भवती महिलांना कोरोनाने ग्रासले
रात्रभर त्याने मृतदेह घरातच ठेवला. मंगळवारी (ता. १२) सकाळी स्वत:च ठाण्यात आला. त्याने पत्नी घरात मृतावस्थेत असल्याचे अधिका-यांना सांगितले. पोलिसांनी सावनेर येथील घटनास्थळी पाहणी केली. प्रारंभी संगीता हिच्या मृत्यूबाबत शेजारी राहणा-या नातेवाइकांसह खुद्द पतीनेही मौन पाळले होते. पतीची कसून चौकशी केली असता, त्याने ब-याच अवधीनंतर पत्नी संगीता हिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. ज्या दोरीने पत्नीचा गळा आवळला ती पोलिसांनी घटनास्थळाहून जप्त केली. सहाय्यक महिला पोलिस निरीक्षक श्रीमती वासनिक यांनी देवानंदला बुधवारी (ता. १३) न्यायालयासमोर हजर केले.