हायवा ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

गिट्टी भरलेला हायवा ट्रक बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला.

हायवा ट्रक ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार

गडचिरोली - गिट्टी भरलेला हायवा ट्रक बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर उलटल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला. ही घटना चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील प्रस्तावित लोहप्रकल्पात गुरुवार (ता. २७) दुपारी १२. १५ वाजताच्या सुमारास घडली. मिथुन निर्मल मंडल (वय ३८) रा. बहादूरपूर, ता. चामोर्शी, असे मृताचे नाव आहे.

कोनसरी येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीच्या वतीने लोह कारखाना उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक हायवा आणि ट्रॅक्टरद्वारे करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी तेथे ट्रॅक्टर उभा असताना बाजूने गिट्टी घेऊन जाणारा हायवा ट्रक या ट्रॅक्टरवर उलटला. यात ट्रॅक्टरचालक मिथुन मंडल हा हायवाखाली दबला. त्याला लगेच आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.