गाडीवर फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्यांनो सावधान! आता तुमच्यावर होणार कडक कारवाई 

मिलिंद उमरे 
Sunday, 1 November 2020

अनेकजण वाहन घेतल्यावर त्यावर क्रमांक लिहिताना बरीच कल्पकता दाखवतात. मग कधी आकड्यांतून दादा, राज, वरद, अशा अनेक नावांचा भास निर्माण करतात, तर कधी आकड्यांचे टोक अशा शैलीदार पद्धतीने वळविले जाते की,

गडचिरोली : वाहनांवरील क्रमांक सुस्पष्ट दिसावेत म्हणून ते पांढऱ्या पाटीवर काळ्या अक्षरात व्यवस्थित लिहावेत असे सरकारचे आदेश असतानाही अनेकजणांनी वाहन क्रमांक विचित्र पद्धतीने लिहिण्याची हौस काही फिटताना दिसत नाही. त्यामुळे वाहन क्रमांकांसंदर्भातील नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

अनेकजण वाहन घेतल्यावर त्यावर क्रमांक लिहिताना बरीच कल्पकता दाखवतात. मग कधी आकड्यांतून दादा, राज, वरद, अशा अनेक नावांचा भास निर्माण करतात, तर कधी आकड्यांचे टोक अशा शैलीदार पद्धतीने वळविले जाते की, त्यातून एखादी आकृती किंवा व्यक्तिचित्राचाही भास होतो. पण, वाहनधारकांच्या या हौशीमुळे वाहतूक पोलिसांना त्रास सहन करावा लागतो. 

हेही वाचा - संशय अखेर ठरला खरा; कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या आकडेवारीतील घोळ सिद्ध

एखाद्या वाहनाने नियम मोडल्यास वाहतूक पोलिस त्या पकडण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे वाहनचालक पसार होतात. अशा वेळेस त्या वाहनाचा क्रमांक नोंदवून ठेवला जातो. या क्रमांकावरून वाहन कोणत्या जिल्ह्यातील आहे, कुठून घेतले, वाहनाचा मालक कोण, अशी सगळी माहिती सहज मिळवता येते.

अनेकजण असे विचित्र पद्धतीने वाहन क्रमांक लिहित असल्याने वाहतूक पोलिसांना क्रमांक ओळखताच येत नाही. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारा वाहनचालक सर्रास निसटतो. म्हणूनच सरकारने स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने वाहन क्रमांक लिहिण्याची सक्ती केली आहे. 

तसेच हे नियम मोडून फॅन्सी पद्धतीने चित्रविचित्र प्रकारे क्रमांक लिहिल्यास कारवाई होते. तरीही हा नियम सर्रास मोडला जात आहे. कुणाला फॅन्सी क्रमांक पाहिजे असल्यास त्याचीही सोय उप प्रादेशिक परिवहन विभागाकडे असते. म्हणजे आपल्या जन्मदिवसाची तारीख असलेले क्रमांक, आपण शुभ मानतो असे क्रमांक, सलग 1111 किंवा 2222 असे आपल्या आवडीचे क्रमांक विशिष्ट शुल्क भरून मिळवता येतात. यांनाही फॅन्सी क्रमांक म्हणतात. 

 हे क्रमांक वाहनावर लिहिताना सुस्पष्ट दिसतील, असेच लिहावे लागतात. ते विचित्र पद्धतीने लिहिल्यास कारवाई होते. असे असतानाही अनेकजण आपली हौस भागवून घेत आहेत.

नक्की वाचा - कर्जबाजारी झाल्यामुळे युवकाने केली आत्महत्या; मृत्यूपूर्वी मैत्रिणीला बोलावले होते भेटायला

दारूतस्करही करतात वापर...

गडचिरोली जिल्ह्यात 1993 पासून दारूबंदी असली, तरी जिल्ह्यात सर्रास अवैध दारूची वाहतूक व विक्री केली जाते. छत्तीसगड, तेलंगणा या परराज्यांसह नजीकच्या गोंदिया जिल्ह्यातूनही दारूची तस्करी होते. हे दारूतस्कर पोलिसांनी वाहन ओळखू नये म्हणून विचित्र प्रकारे क्रमांक लिहिलेली किंवा विनाक्रमांकाची वाहने वापरतात.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you have fancy number plate on vehical then police take strict action