नवरीसोबत सासरी गेलेल्या बहिणीवर ओढवला असा काही प्रसंग की... 

संतोष तापकिरे
गुरुवार, 16 जुलै 2020

जून 2020 च्या दुसऱ्या आठवड्यात पीडितेच्या बहिणीचे लग्न झाले होते. नवी नवरी असलेल्या बहिणीसोबत ही युवती तिच्या सासरी गेली. दुसऱ्याच दिवशी आरोपी अभिजितने एमएच 27- 4190 क्रमांकाच्या दुचाकीवर बसवून तिला शहरातील टोपेनगर परिसरात नेले.

अमरावती  : लग्नानंतर नवरीसोबत तिच्या सासरी गेलेल्या बहिणीचे एका युवकाने अपहरण करून स्वत:च्या घरात डांबून ठेवले व तिला मारहाण केली. पीडित तरुणी बऱ्याच दिवसांपासून दहशतीत होती. अखेर तिने फ्रेजरपुरा ठाणे गाठून तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी युवकासह तिघांविरुद्ध अपहरण, डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अभिजित कैलास खोडे (वय 23, रा. शिराळा), प्रतीक दीपक बोरकर व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जून 2020 च्या दुसऱ्या आठवड्यात पीडितेच्या बहिणीचे लग्न झाले होते. नवी नवरी असलेल्या बहिणीसोबत ही युवती तिच्या सासरी गेली. दुसऱ्याच दिवशी आरोपी अभिजितने एमएच 27- 4190 क्रमांकाच्या दुचाकीवर बसवून तिला शहरातील टोपेनगर परिसरात नेले. पीडितेने आरडाओरड केली असता तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवले व जबर मारहाण केली. त्यात पीडित युवती जखमी झाली. रात्रभर डांबून ठेवलेल्या युवतीच्या भावाने अभिजितच्या घरून बहिणीला सोडवून आणले. त्यानंतर घटनाक्रम पीडितेने पालकांजवळ सांगितला. पालकांनी बदनामी होईल या भीतीने तक्रार देण्याचे धाडस सुरुवातीला दाखविले नाही. आरोपी अभिजीतने पुन्हा तिच्या घरी जाऊन वाद घातला. तिला धमक्‍या दिल्या. त्रासामुळे वैतागलेल्या युवतीने अखेर मंगळवारी (ता.14) फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणी पोलिसांनी अभिजित, प्रतीकसह एक महिला अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

अवश्य वाचा- प्रेयसीच्या कुटुंबीयांनी घातली सरकारी नोकरीची अट, मग विरहातून त्याने संपविले जीवन

विनयभंगाचा गुन्हा 

अभिजित खाडेसह त्याच्या पालकांनी संबंधित युवतीच्या घरी धाव घेतली. तिच्या पालकांपुढे अभिजितसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव युवतीने नाकारला. वर्षभरापासून अभिजित पाठलाग करून छेडखानी करीत आहे, अशी तक्रार पालकांनी नोंदविली. प्रकरणी वलगाव पोलिसांनी अभिजितविरुद्ध विनयभंगाचा तर त्याच्या पालकाविरुद्ध गुन्ह्यात सहकार्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, असे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. 

संपादन - राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An incident that dragged on the sister who went to the in-laws with the bride ...