esakal | फुलांची आवक; दरात दुपटीने वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

फुलांची आवक; दरात दुपटीने वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पावसाळा लांबल्याने फुलांचे उत्पन्न निघालेच नाही. स्थानिक बाजारपेठेत फुलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात पुणे, हैदराबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर येथून फुलांची आवक होत आहे. परिणामी दुपटीने दर वाढल्याने उत्सवाच्या तोंडावरच ग्राहक कोमेजलेले दिसून येत आहेत.

सध्या सण, उत्सवांचे दिवस सुरू आहेत. सोमवारी (ता.2) घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी श्रीगणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. येत्या पाच सप्टेंबरला महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. याच महिन्यात दुर्गोत्सवाला सुरुवात होणार आहे. यासाठी विविध प्रकारच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक फुलविक्रेत्यांकडे फुलांची शेती आहे. वेळेवर पाऊस आल्यास श्रीगणेशोत्सवाच्या तोंडावर फुले बाजारपेठेत आणली जातात. मात्र, यंदा पावसाळा लांबल्याने एक महिना उशिरा पेरणी करण्यात आली. त्यामुळे फुलांचे उत्पन्नही उशिरा येणार आहे. गेल्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी केल्याने ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला स्थानिक विक्रेत्यांची फुले बाजारपेठेत येण्याची शक्‍यता आहे. स्थानिक विक्रेत्यांकडे फुलेच नसल्याने पुणे, हैदराबाद, नागपूर, नांदेड व अहमदनगर येथून फुलांची आवक होत आहे. त्यामुळे फुलांचे दरही वाढलेले आहेत. सर्वाधिक मागणी असलेला व 80 रुपये प्रतिकिलोला मिळणारा झेंडू आज 150 ते 180 रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचला आहे. 200 रुपये प्रतिकिलो असलेली शेवंती 400 रुपये प्रतिकिलोपर्यंत झाली आहे. आवडता निशिगंधा 250 वरून 400 रुपयांवर पोहोचला आहे. गणपती मूर्तीला रोज पुष्पहार लागत असल्याने झालेल्या दरवाढीने ग्राहक कोमेजलेले दिसून येत आहेत.

माझ्याकडे चार एकर शेती आहे. त्यामध्ये दरवर्षी झेंडू, शेवंती व निशिगंधाच्या फुलांचे उत्पन्न घेतो. मात्र, यंदा पाऊस एक महिना लांबल्याने मला बाहेरून फुले खरेदी करून विक्री करावी लागत आहे. त्यामुळे दरवाढ झालेली आहे.
- देवा राऊत, फुलविक्रेता, दत्त चौक, यवतमाळ.  

loading image
go to top