कुटुंबाला एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला खरा; मात्र, नातेच उठले एकमेकांच्या जीवावर

सूरज पाटील 
Tuesday, 2 June 2020

क्षुल्लक कारणातून पवित्र नात्याला संपविण्यात आल्याच्या घटना चर्चिल्या आल्यात. मात्र, अनेक कौटुंबिक वादाच्या घटना चार भिंतीच्या आड मुक्‍या झाल्या आहेत. कोरोनाचे संकट आज नाही तर उद्या निघून जाईल. त्याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. तोपर्यंत मानसिक स्वास्थ टिकावे, यासाठी सरकारस्तरावरून अधिक जनजागृती होणे आवश्‍यक आहे. 

यवतमाळ : कोरोनाच्या संकटात मानवी जीवनात निर्माण झालेला ताण-तणावांचा पट खूपच मोठा आहे. आजच्या खाण्या-पिण्याची सोय होईल का, आपण जगू का, अशा चिंतेचा आलेख आहे. त्यातच लॉकडाउन काळात घरात बंदिस्त झाल्याने जीवन जगण्यावर निर्बंध आले आहे. अनेकांचे मानसिक संतुलन बिघडल्याने चिडचिडेपणा वाढला आहे. तो इतका की, पवित्र नात्याची वीण रक्ताने काळवंडली गेली आहे. 

20 ते 35 वयोगट असलेल्या तरुण पिढीच्या आयुष्यातील शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा सर्वव्यापी दुखण्यावर कोरोनाचे आक्रमण झाले आहे. अनेकांना रोजगार व नोकरी गमवावी लागली आहे. गावातही हाताला कामे नसल्याने बसून-बसून चिंतेच्या सावटात ताण-तणाव अधिकच वाढला आहे. कधी नव्हे तो कुटुंबातील सदस्यांना एकत्र राहण्यासाठी वेळ मिळाला. मात्र, त्यात आपुलकीचा ओलावा कमी आणि वादविवाद अधिक असेच चित्र बघावयास मिळत आहे. हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा सुन्न करणारी आहे.

हेही वाचा - रस्त्यावर फिरत होत्या आठ तरुणी, पोलिसांनी विचारताच ऐकविली अंगावर काटा आणणारी आपबीती

यवतमाळपासून ते दुर्गम भागात क्षुल्लक कारणातून रक्ताच्या नात्याला संपविण्यात आल्याच्या घटना मे महिन्यात घडल्या. महागाव तालुक्‍यात वडिलांनी मोबाईल फोडल्याच्या संतापातून विधीसंघर्षग्रसत मुलाने जन्मदात्याचा खून केला. केळापूर तालुक्‍यात पती-पत्नीच्या वादात पित्याने चिमुकल्या मुलीला जमिनीवर आदळून संपविले. घाटंजी तालुक्‍यात मुलीला विहिरीत फेकून वडिलाने आत्महत्या केली. 

यवतमाळ शहरात आईच्या चारित्र्यावर वडील संशय घेत असल्याच्या रागात वडिलांचा खून केला. नेर तालुक्‍यात विधीसंघर्षग्रस्त बालकाने वडिलाचा खून केल्याची घटना अगदी ताजीच आहे. या सर्वच घटना घरात बंदिस्त जीवन जगत असताना घडल्या आहेत. मन अस्वस्थ असताना चिंतेच्या काहुरातून घडलेल्या घटना समाजमनाला चिंतन करायला भाग पाडते. 

क्षुल्लक कारणातून पवित्र नात्याला संपविण्यात आल्याच्या घटना चर्चिल्या आल्यात. मात्र, अनेक कौटुंबिक वादाच्या घटना चार भिंतीच्या आड मुक्‍या झाल्या आहेत. कोरोनाचे संकट आज नाही तर उद्या निघून जाईल. त्याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. तोपर्यंत मानसिक स्वास्थ टिकावे, यासाठी सरकारस्तरावरून अधिक जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

अधिक माहितीसाठी - 'लिव्ह इन'मध्ये राहायचे प्रेमीयुगुल; संबंधात अडथळा आल्याने युवक चवताळला अन्‌...

घराघरांत रोजगाराची चिंता

कोरोनाला हरविण्यासाठी लॉकडाउन सुरू झाल्याने अनेकांच्या व्यवसाय व नोकऱ्यांवर गडांतर आले. काही दिवस शांत गेल्यावर पुन्हा पोटाची चिंता सतावू लागली. जुना व्यवसाय ठप्प झाल्याने काहींनी नवीन रोजगाराचा मार्ग निवडला. याच काळात सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आत्महत्येत वाढ झाली. वर्तमान सोडून भविष्यातील रोजगाराची चिंता आता घराघरांत सतावत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in crime incidents during lockdown