परदेशी नोकरीच्या आकर्षणाने वाढली फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

विदेशात राहण्याचे आकर्षण हेच एकमेव कारण सायबर गुन्हेगारांनी हेरले. त्यामुळे विदेशात नोकरी किंवा ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी मदतीसह विदेशातून गिफ्ट पाठविले असल्याचे अनेक फंडे सायबर क्रिमिनल्स वापरतात. सायबर गुन्हेगारांनी नागपुरातून आतापर्यंत शेकडोंना कोट्यवधींना गंडा घातल्याची माहिती उघडकीस आली.

नागपूर  : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड यांसह अन्य देशांत नोकरीचे आमिष दाखवून भारतीयांना लाखो रुपयांनी गंडा घालण्याच्या प्रकारात वाढ झाली. गेल्या आठवड्यात विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नागपुरातील तीन जणांची फसवणूक करण्यात आली.

विदेशात राहण्याचे आकर्षण हेच एकमेव कारण सायबर गुन्हेगारांनी हेरले. त्यामुळे विदेशात नोकरी किंवा ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी मदतीसह विदेशातून गिफ्ट पाठविले असल्याचे अनेक फंडे सायबर क्रिमिनल्स वापरतात. सायबर गुन्हेगारांनी नागपुरातून आतापर्यंत शेकडोंना कोट्यवधींना गंडा घातल्याची माहिती उघडकीस आली. नुकतेच एका उच्चशिक्षित सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तब्बल 56 लाखांनी फसवणूक केल्याचे समजते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम उद्धव सहारे (वय 72) अमरावती रोडवरील तिलकनगर हिमालय आर्किट अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहतात. त्यांनी भारतातील काही राज्यात पल्प ऍण्ड पेपर इंडस्ट्रीजमध्ये टेक्‍निकल एक्‍स्पर्ट म्हणून नोकरी केली. ते 2017 पर्यंत इंडोनेशियातील पेपर इंडस्ट्रिजमध्ये टेक्‍निकल एक्‍स्पर्ट म्हणून नोकरीवर होते. सेवानिवृत्तीनंतर ते भारतात आले. त्यांचा एकुलता एक मुलगा आणि पत्नीसह ते तिलकनगरात राहत होते.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना एक ईमेल आला. कॅनडामध्ये क्‍युसेड पॉइंट एनर्जी कंपनीत टेक्‍निकल एक्‍स्पर्ट पदावर नोकरी करण्याची ऑफर देण्यात आली. त्यासाठी स्पेशल व्हिजा आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले. क्रेग बिक्‍सा नावाच्या व्यक्‍तीने एका कंपनीचा अध्यक्ष आणि सीईओ असल्याचे सांगितले. त्यांनी व्हिसा तयार करण्यासाठी आणि अन्य कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी चेस्टा ब्राउन नावाच्या व्यक्‍तीचा मोबाईल क्रमांक दिला.

चेस्टाने वेळोवेळी सहारे यांना फोन करून वेगवेगळ्या कामासाठी 50 हजार ते एक लाख रुपये अशी मागणी केली. सहारे यांना विदेशातील प्रक्रिया माहिती असल्याने त्यांनी लगेच पैसे ट्रान्सफर केले. त्यामुळे चेस्टा आणि ब्रिक्‍स यांचे फावले. त्यांनी 11 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2019 यादरम्यान वेगवेगळी कारणे सांगून 56 लाख 67 हजार रुपये वेळोवेळी उकळले. 

पूर्ण पैसे करू रिफंड

कंपनीच्या पॉलिसप्रमाणे भारतात कागदपत्रे तसेच व्हिसासाठी लागणारा खर्च स्वतः करायचा आहे. तो सर्व खर्च आमची कंपनी रिफंड करेल. त्यामुळे तुम्ही कितीही खर्च झाला तरी घाबरू नका. ते सर्व पैसे आम्ही परत करणार आहो, अशी बतावणी सायबर गुन्हेगारांनी केली. 

 
अशी झाली फसवणूक 

सुरुवातीला शांताराम सहारे यांना 50 हजार रुपयांची मागणी आरोपींनी केली. त्यांनी लगेच पूर्ण मागणी केल्याने त्यांनी लगेच पाच लाख रुपये तसेच व्हिसासाठी आठ लाख रुपयांची मागणी केली. सहारे कोणताही प्रतिकार न करता पैसे देत असल्याने आरोपींनी तब्बल 56 लाख 67 हजार रुपये उकळले. मात्र, अचानक संपर्क बंद झाला आणि ईमेलही येणे बंद झाल्याने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased fraud by the attractiveness of a foreign job