
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. सुरुवातीच्या काळात या समित्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यासाठी काही गावांना शासनाने पुरस्कार देऊन गौरविले. परंतु सुरुवातीच्या काळातील उत्साह कालांतराने ओसरू लागला.
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : गावगाड्यातील तंट्याचा निपटारा गावातच व्हावा. गावखेड्यातील नागरिकांनी पोलिस ठाणे, न्यायालयाची पायरी चढू नये, पोलिस यंत्रणेवरील कामाचा ताण कमी व्हावा तसेच गावातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत व्हावी यासाठी गावागावात तंटामुक्त समित्या स्थापन केल्या. मात्र, सुरवातीच्या काळातील या समित्यांचा उत्साह आता कमी झाला आहे. आता या समित्यांचे सक्षमीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले. सुरुवातीच्या काळात या समित्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यासाठी काही गावांना शासनाने पुरस्कार देऊन गौरविले. परंतु सुरुवातीच्या काळातील उत्साह कालांतराने ओसरू लागला. या समित्यांमुळे गावातील अवैध व्यवसाय बंद झाले होते. आता या व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढले आहेत.
ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये या समित्या केवळ नाममात्र उरल्या आहेत. गावातील वाद, तंटे आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचत आहेत. परिणामी समित्यांच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. यानिमित्ताने समित्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अलीकडच्या काळात अध्यक्ष, सदस्यांच्या निवडीत गावपातळीवर राजकारण सुरू झाले. प्रतिष्ठेसाठी सदस्य झाले. परंतु नंतर वेळ द्यावा लागतो यासाठी समितीतून काढता पाय घेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यांच्यासाठी पद शोभेची वस्तू ठरली.
कडाक्याच्या थंडीत वाढली हुरड्याची रंगत; चुलीवरच्या जेवणासाठी गावाकडे धूम
तालुक्यात अनेक ठिकाणी अध्यक्ष, सदस्यांची पदे रिक्त आहेत. काही गावांतील अध्यक्षांनी दारू, वाळू तस्करांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्या केवळ कागदावरच दिसत आहेत. सुरुवातीच्या काळातील समित्यांची कार्यक्षमता आता तालुक्यातील एकाही गावात दिसत नाही. प्रारंभी या समित्यांनी लक्षवेधक कामे केली. शासनाचा, जनतेचा विश्वास संपादन केला. तंटे गावातच मिटविले. त्यामुळे लोकसंख्येवर आधारित दोन ते दहा लाखापर्यंत बक्षिसे मिळविली. मात्र, अलीकडच्या काळात तंटामुक्त समित्या नावालाच शिल्लक असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अनेक गावांतील तंटामुक्त समित्यांचे अध्यक्ष, सदस्य हे नावपुरतेच आहेत. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन तंटामुक्त समितीची फेररचना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रिक्त असलेल्या जागा त्वरित भरून समितीला बळकटी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संपादन ः राजेंद्र मारोटकर