
Nagpur : नागपूर कसोटीत भारताचा एक डाव १३२ धावांनी मोठा विजय ; तीन दिवसांच्या आत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा
नागपूर - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकताना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी एक डाव १३२ धावांनी पराभव केला आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
जामठा स्टेडियमवर तीन दिवसांच्या आत संपलेल्या या कसोटीत खेळपट्टीची भूमिका महत्त्वाची असली तरी रोहित शर्माचे शतक, जडेजा व अक्षर पटेलचे अर्धशतक, जडेजा व अश्विनच्या फिरकी गोलंदाजीचे योगदान निर्णायक ठरले.
उपाहाराच्या ठोक्याला भारताचा पहिला डाव ४०० धावांवर आटोपल्यानंतर डावाने पराभव टाळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला २२३ धावांची गरज होती. मात्र, उपाहारानंतर नुसती पडझड पाहायला मिळाली. एका पाठोपाठ एक मोहरे गळत असताना दुसऱ्या टोकाला उभा असलेला स्टिव्ह स्मिथ असाह्यपणे पाहत होता.
त्यानेच सर्वाधिक नाबाद २५ धावा केल्या. जडेजाने स्मिथचाच त्रिफळा उडवून भारताला विजय मिळवून दिल्याने भारतीय खेळाडूंसह स्टेडियमवर उपस्थित ३० हजार प्रेक्षकांनी जल्लोश केला होता.
मात्र, काही सेकंदात पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी जडेजाने टाकलेला बॉल नोबॉल ठरविल्याने भारतीयांचा आनंद क्षणभंगूर ठरला. पुढच्याच षटकात शमीने बोलंडला यष्टीसमोर पकडले. बोलंडने डीआरएसचा आधारही घेतला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही व ऑस्ट्रेलियाचा डाव ९१ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जामठाच्या खेळपट्टीचा इतका धसका घेतला होता की दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केल्यावर त्यांनी सहजपणे फटके मारण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अतिबचावात्मक पवित्रा स्वीकारला. त्याचा फटका त्यांना बसला. त्यामुळे अश्विनच्या भन्नाट फिरकीचा त्यांना सामनाच करता आला नाही.
अश्विनच्या गोलंदाजीवर कोहलीने स्लीपमध्ये ख्वाजाचा झेल घेतला. कोहलीला वॉर्नरची तशीच एक संधी मिळाली होती. मात्र, तो झेल पकडू शकला नाही. त्यावेळी वॉर्नर दोन धावांवर होता. मात्र, हे जीवदान फार महाग पडले नाही. कारण अश्विननेच त्याला केवळ आठ धावांची भर पडल्यावर बाद केले.
त्यानंतर आलेले लाबूशेन, रेनशॉ व हँडसकॉम्ब हे जवळपास सारख्याच पद्धतीने बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची ५ बाद ५२ अशी नाजूक स्थिती झाली होती. उपाहारानंतर या सर्व घडामोडी घडत होत्या. अॅलेक्स केरीने खेळपट्टीवर येताच पुन्हा रिव्हर्स स्विप मारण्यास सुरुवात केली व अश्विनच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार मारले.
त्याचा असाच एक प्रयत्न फसला व तो पायचीत झाला. पहिल्या डावातही अश्विनच्या गोलंदाजीवर तो असाच त्रिफाळाचीत झाला होता.
जडेजा लवकर बाद
सकाळी खेळ सुरू झाला त्यावेळी भारताचे चार फलंदाज किती धावांची भर टाकतात याकडे सर्वांचे लक्ष होते. जडेजा, अक्षर, शमी व सिराज यांनी मिळून आज ७९ धावांची भर घातल्याने ऑस्ट्रेलियावर दबाव वाढविता आला.
जडेजा व अक्षर पटेल या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र, या जोडीला दुसऱ्या दिवशीच्या धावसंख्येत सात धावांची भर टाकता आली. मर्फीच्या एका चेंडूचा अंदाज न आल्याने जडेजाला आपली विकेट गमवावी लागली.
जडोजानंतर आलेल्या शमीला बोलंडने लायनच्या गोलंदाजीवर जीवदान दिले. त्यावेळी शमी सहा धावांवर होता. हे जीवदान ऑस्ट्रेलियाला चांगलेच महागात पडले. कारण शमीने त्यानंतर आपल्या धावसंख्येत ३१ धावांची भर घातली. त्यात त्याने मर्फीच्या गोलंदाजीवर तीन षटकार खेचले. त्यापैकी दोन सलग होते. आता दुसरा कसोटी सामना नवी दिल्लीत शुक्रवार १७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.