बाप रे बाप...दीडशे कोटींचा फटका!

Industries.jpg
Industries.jpg

अकोला : भरभराटीच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्ह्यातील उद्योगाचे लॉकडाउनमध्ये कंबरडे मोडले असून, जवळपास एक हजार उद्योग बंद पडल्याने सुमारे दीडशे कोटींचा फटका येथील उद्योगाला बसला आहे. सध्या सुरू असलेल्या उद्योगाचा गाडा सुद्धा केवळ 40 टक्के मजूर सांभाळत असून, उद्योजकांना उर्वरित मजुरांच्या परतण्याची प्रतीक्षा लागली आहे.

जिल्हाभरात एकूण 1500 लघु, मध्यम व मोठे उद्योग आहेत. त्यापैकी मध्यम उद्योगाची संख्या सर्वाधिक असून, जवळपास 50 टक्के उद्योग कृषी आधारित आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये सध्या सुमारे तीन हजार मजूर/कामगार काम करीत असून, जवळपास 60 टक्के मजूर होळी निमित्त बाहेर गावी गेले असून, लॉकडाउनमुळे अडकून बसले आहेत. शिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आल्याने, वाहतूक व्यवस्था खोळंबून जवळपास महिनाभरापासून उद्योगांना कच्चा माल पुरवठा, उत्पादनाचा पुरवठा, पॅकेजिंग मटेरिअल, मशिनचे सुटे भाग मिळणे कठीण झाले होते. मजुरांच्या अभावाने कामाची वेळही कमी झाली. त्यामुळे उत्पादन निर्मिती सुद्धा अर्ध्यावर आली असून, 60 टक्के उद्योग अजूनही बंद असल्याने, सुमारे दीडशे कोटी रुपयांचा फटका येथील उद्योगाला बसला आहे.

उद्योग क्षेत्रातील अडचणी

  • अपुरी मजूर संख्या.
  • लॉकडाउन वेळेत मजूर/कामगारांना ने-आण करायचे कसे.
  • सर्व मजूर प्रिमायसेसमध्ये ठेवणे जिकरीचे.
  • कच्चा माल, मशिनचे सुटे भाग मिळणे.
  • बाजारपेठेतून उत्पादनांची घटलेले मागणी.
  • प्रशासनाच्या अटीशर्ती, नियमांमध्ये अस्पष्टता.
  • लॉकडाउन व संसर्ग रोखण्याविषयी मार्गदर्शनाचा अभाव.

उद्योग क्षेत्रातील मागण्या

  • मजूर/कामगारांना ने-आण करण्यासाठी महापालीकेने सीटीबस सुविधा पुरवावी.
  • माल वाहतूक सुविधेसाठी शासकीय पोर्टल उभारावे.
  • शेकडो मजूर कामाच्या शोधात असून, त्यांची नोंदणी करावी.
  • त्यांचेसाठी ट्रेनिंग सेंटर, गाईडलाइन सेंटर उभारुन त्यांना राजगार द्यावा.
  • उद्योग, लॉकडाउन, नियम, निर्जतूकिकरणाविषयी मार्गदर्शन केंद्र उभारावे.
  • फुड पॅकेजिंग व फुड प्रोसेसिंग युनिट उभारावे.

दालमिल उद्योगाला 30 कोटींचा फटका
जिल्ह्यात जवळपास 200 ते 250 दालमिल उद्योग असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत जवळपास 150 मोठे दालमिल उद्योग उभारलेले आहेत. त्यामध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालत होते. त्यानुसार या दालमिलमधून महिनाभरात सुमारे 60 कोटीचे उत्पन्न घेतले जाते. परंतु, लॉकडाउन करण्यात आल्यामुळे जवळपास दीड महिन्यापासून या सर्व दालमिलमध्ये मजुरांअभावी एकाच शिफ्टमध्ये काम सुरू असून, त्यामुळे प्रोडक्शन सुद्धा निम्म्यावर आले आहे. त्यामुळे जवळपास 30 कोटीचा फटका अकोला जिल्ह्यातील दालमिल उद्योगाला बसला आहे.

...तर मिळेल कृषी आधारित उद्योगांना चालना
केवळ 40 टक्के मजूर, कामगार उपलब्ध असल्याने एकाच शिफ्टमध्ये येथील दालमिलचे काम सुरू आहे. कच्चामाल उपलब्धतेबाबत आतापर्यंत काही प्रमाणात अडचण होती. मशिनचे सुटेभाग मिळत नव्हते. सध्याची मोठी अडचण म्हणजे लॉकडाउनमुळे बाजारपेठेत मागणीच नाही. त्यामुळे शासनाने नियोजनपूर्वक बाजारपेठ अधिक काळ सुरू ठेवावी, जेणेकरुन कृषी आधारित उद्योगांना चालना मिळेल.
- प्रमोद खंडेलवाल, अध्यक्ष, दाल मिल असोसिएशन, अकोला

70 टक्के उद्योग सुरू
सध्या उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी मिळत असून, कृषी आधारित जवळपास 70 टक्के उद्योग सुरू आहेत. कच्चा माल मिळण्याची महिनाभरापासून अडचण होती. मात्र मजूर उपलब्धतेची मोठी अडचण जिल्ह्यातील उद्योगाला भेळसावत आहे. परंतु, मजूरांच्या ये-जा करण्याबाबत प्रशासनाने काही प्रमाणात वेळेची शिथीलता द्यावी, जेणेकरुन अधिक वेळ उद्योग सुरू राहू शकतील व निर्मिती क्षमता वाढेल. पॅकेजिंग व इतरही संलग्नीत उद्योग सुरू होणे अपेक्षित आहेत.
- उन्मेष मालू, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन, अकोला

नियमांची स्पष्टता आणि मार्गदर्शन हवे
उद्योग क्षेत्राला चालना मिळण्यासाठी नियमांची स्पष्टता, पारदर्शकता, मार्गदर्शन सुविधा प्रशासनाने प्रदान करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात जवळपास दीड हजार उद्योग असून, त्यापैकी सध्या 40 ते 45 टक्केच उद्योग सुरू आहेत. उद्योगांना सध्या अत्यल्प मजूरांच्या भरवश्यावर काम करावे लागत असल्याने, कामाची वेळ व उत्पादन क्षमता कमी झाली आहे. तांत्रिक कामगार सुद्धा लॉकडाउनमध्ये अडकले आहेत.
- नितीन बियाणी, सचिव, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशन, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com