तुमसरात कुख्यात गुंडाची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

तुरुंगात शिक्षा भोगत असल्याने तो जामिनावर घरी आला होता. त्याच्यावर खुनाचे तीन गुन्हे दाखल होते. त्यापैकी एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली.

तुमसर(भंडारा): शहरातील सराईत गुंडाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. कोष्टी शिवारात त्याचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत हा जामिनावर सुटून आला होता. महेश मन्साराम हजारे(वय 32, रा. आझादनगर) असे मृताचे नाव आहे. 

महेश हजारे हा सराईत गुन्हेगार

आज सकाळी साडेसातच्या सुमारास कोष्टी रस्त्यावर रक्ताने माखलेले व शरीरावर धारदार शस्त्राचे घाव असलेला मृतदेह पडून असल्याचे दिसून आले. घटनास्थळी जमलेले नागरिकांनी या घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असता, मृताच्या डोक्‍याच्या मागील भाग, पोटावर, तोंडावर मोठ्या जखमा दिसून आल्या. मृत महेश हजारे हा सराईत गुन्हेगार होता. 

खुनाचे तीन गुन्हे दाखल

तुरुंगात शिक्षा भोगत असल्याने तो जामिनावर घरी आला होता. त्याच्यावर खुनाचे तीन गुन्हे दाखल होते. त्यापैकी एका गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली. गुन्हेगारी प्रकरणात लिप्त असल्याने जुन्या वैमनस्यातून त्याचा खून होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला असून कसून तपास केला जात आहे. महेशचा खून हा इतरत्र कुठेतरी झाला असून कोष्टी शिवारात मृतदेह टाकून दिला असावा, असाही पोलिसांचा कयास आहे. महेशचा भाऊ विष्णू हजारे याच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार मनोज सिडाम करीत आहेत. 

तुमसरात खूनसत्र; गुन्हेगारीत वाढ! 

तुमसर शहरात दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगारीचे शहर म्हणून या शहराची नव्याने ओळख होत आहे. 5 जानेवारीला साहिल ललित शेंद्रे या सफाई कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आला होता. खुनासह वाटमारी आणि विविध गुन्हे शिरावर असलेल्या बाबू बॅनर्जी रा. जगनाडेनगर या सराईत गुंडाचीसुद्धा 25 सप्टेंबरला धारदार शस्त्राने हत्या झाली होती. सातत्याने घडणाऱ्या खूनसत्राने शहर हादरले आहे. 

महेशच्या शिरावर होते तीन खून 

महेश हजारे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर तीन खुनाचे आरोप आहेत. त्याने 2014 मध्ये आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेऊन ऐका युवकाची निर्घृण हत्या केली होती. त्यात त्याने शिक्षाही भोगली. त्यानंतर तुमसर रोड येथे रेल्वेरुळावर मौदा येथील युवकाच्या हत्येमध्येही तो सामील होता. दोन वर्षांपूर्वी पोळ्याच्या रात्री मालवीयनगर येथे रोहित तांडेकर याचासुद्धा त्याने साथीदारासह गेम केला होता. वृत्त लिहिपर्यंत कुणालाही ताब्यात घेण्यात आले नव्हते. खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी गुन्हेगारीतील वादातून त्याचा काटा काढण्यात आला असावा, अशी चर्चा आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The infamous gangster killed in Tumsar